देवगड (प्रतिनिधी)२९ जून २०२४
घरात कोणालाही न सांगता निघून गेलेल्या तोरसोळे आंबोळवाडी येथील विवाहित महिलेच्या मृतदेह घरा पासून काही अंतरावर असलेल्या नदीपात्रात २९ जून रोजी सकाळी ८ वाजता आढळून आला. संगीता संतोष कडव (५२) असे या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , तोरसोळे आंबोळवाडी येथील संगीता संतोष कडव ही महिला मनोरुग्ण होती. तिच्यावर औषध उपचार सुरू होते, दिनांक २८ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता घरातून ती निघून गेली. तिचा शोध तिचे दिर पंढरीनाथ आत्माराम कडव व गावातील ग्रामस्थांनी घेतला. मात्र ती कोठेही सापडली नाही. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या नदीपात्रात तिचा मृतदेह दिसून आला. याबाबतची खबर तिचे दीर पंढरीनाथ कडव यांनी देवगड पोलीसांत दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करत आहेत.
