‘त्या’ मासेमारी ट्रॉलर अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले..

पाच महिन्यापूर्वी आचरा समुद्रात अनधिकृत मासेमारी करताना केली होती कारवाई;मालवण तहसीलदार आदेशाविरोधात केले होते अपील

मालवण दि प्रतिनिधी पाच महिन्यापूर्वी आचऱ्याच्या वीस वाव खोल समुद्रात बेकायदेशीर रित्या एलईडी पर्ससीननेटची मासेमारी करताना मत्स्यव्यवसाय विभागाने पकडलेला अल-हसीब टॉलर मासेमारीच्या साहित्यासह जप्त करून या टॉलरचा मासेमारी परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित टॉलर मालकांने धाव घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे टॉलर मालकांने दाखल केलेले अपील फेटाळून लावत तहसीलदारांनी दिलेला निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने कायम केला आहे. आचरा, येथील रिहान युसुफ मुजावर यांच्या मालकीची ‘अल – हसीब’ (आयएनडी एमएच ५ एमएम १३२) ही मासेमारी नौका १४ नोव्हेंबरला मध्यरात्री अडीचच्या सुमारास आचरा बंदरासमोर २० वाव खोल समुद्रात एलईडी दिव्यांच्या साह्याने बेकायदेशीररित्या पर्ससीन नेट मासेमारी करीत असताना मस्य व्यवसाय विभागाला आढळून आल्यानंतर सदरची मासेमारी नौका पकडण्यात मत्स्य विभागाच्या ‘शीतल’ गस्ती नौकेस यश आले होते. कारवाईत नौकेतील जनरेटरसह पाण्याखाली सोडला जाणारा एक एलईडी दिवा व चार मोठे हॅलोजन ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी पुढील कारवाईसाठी मत्स्य विभागाने प्रतिवेदन मालवण तहसीलदारांकडे सादर केले असता नौका जप्तीचे आदेश तहसीलदारांनी दिले होते. मात्र, या निर्णयाविरोधात संबंधिताने जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. परंतु मालवण तहसीलदारांचा निर्णय कायम ठेवत अपील अमान्य करण्यात आले.

You cannot copy content of this page