कुडाळात उद्या ‘उमंग’ करियर मार्गदर्शन शिबिर…

⚡कुडाळ ता.२८-: रोटरी क्लब ऑफ कुडाळ,
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित आणि सिंधू संकल्प अकॅडमी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवार २९ जून रोजी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘उमंग’ हा करियर मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वा. या वेळेत सिद्धिविनायक हॉल (रेल्वे स्टेशन रोड) कुडाळ येथे हा कार्यक्रम होणार आहे. हे शिबिर मोफत असून यावेळी करिअरच्या विविध संधी, तंत्रज्ञानातील प्रगती आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.


कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेस रोटरी क्लब अध्यक्ष दिनेश आजगावकर, असी. गव्हर्नर राजन बोभाटे, गव्हर्नर अॅड. गजानन कांदळगावकर, सिंधुसंकल्प अकादमीचे केदार देसाई, एमकेसीएलचे प्रतिनिधी देवेंद्र गावडे, राकेश तिरोडकर व भूषण तेजम आदी उपस्थित होते.
तेली म्हणाले, आम्ही गेली दोन वर्षे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कुडाळ शहरात करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करतो. या प्रतिसादानंतर यंदाही ‘उमंग’ हा करियर मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किशोर तावडे असून उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि डॉ. अमेय देसाई (मुंबई) उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘सारथी’च्या सहसंचालिका तथा कोल्हापूरच्या अति. जिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, एमकेसीएलचे जनरल मॅनेजर विकास देसाई व अमित रानडे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मार्गदर्शन शिबिरामध्ये आयपीएस ऑफिसर तथा जिल्हा अति. पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला, डॉ. संजय केसरे, डॉ. संजय सावंत, उद्योजक नितीन वाळके, राजन गिरप, शिवानंद भिडे, प्रणाली मयेकर, विविध डॉक्टर विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गोवा येथील प्रेरणादायी वक्ते सुभाष साजणे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याप्रसंगी एमकेसीएलच्या करिअर अॅपचे अनावरण होणार असून उपस्थित विद्यार्थ्यांना एमकेसीएल करिअर अॅप मोफत दिले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा समावेश असलेल्या करिअर मंत्राचे प्रकाशन करण्यात येईल.

You cannot copy content of this page