नगरपालिकेने हॉटेल, लॉज व्यावसायिकाना घरपट्टीत ५० टक्के सूट द्यावी…

मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांची मागणी

मालवण दि.३१ मालवण शहर प्रामुख्याने पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र मागील मार्च महिन्यापासून कोरोनामूळे अलीकडील एक- दोन महिन्यांचा अपवाद वगळता पर्यटन ठप्प असून हॉटेल, लॉज व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे नगरपालिकेमार्फत या वर्षी कोरोना कालावधी लक्षात घेऊन हॉटेल, लॉज व्यावसायिकांना घरपट्टीतून ५० % सूट मिळावी, त्याबाबतचा प्रस्ताव पालिकेने मुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांकडे पाठवावा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी केली आहे. मागील मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे हॉटेल व्यवसाय बंद आहे. जिल्ह्यातील महामार्गावरच्या अन्य शहरांमध्ये ग्राहकांची नेहमी रेलचेल असते. मात्र मालवण शहरात हॉटेल व्यवसाय केवळ पर्यटकांवर अवलंबून असतो. पर्यटक मालवणात आले तरच येथील हॉटेल्स, लॉजचा व्यवसाय चालणार आहे. मात्र मागील एक दोन महिन्यांचा अपवाद वगळता कोरोनामुळे येथील पर्यटक संख्या प्रचंड रोडावली असून लॉज, हॉटेलमध्ये ग्राहक येणे मुश्किल बनले आहे. यंदा मार्च महिन्यात वीज बिल, बँकांचे हप्ते, पाणीपट्टी यामध्ये लोक अक्षरशः होरपळून गेले असताना घरपट्टी कशी भरायची ?असा यक्ष प्रश्न हॉटेल व्यावसायिकां समोर उभा ठाकला आहे. अलीकडे पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरळीत होत असताना नव्याने कोरोनाचे रुग्ण मिळून आल्याने आता पुन्हा एकदा शासनाकडून लॉकडाऊनची भीती दाखवली जात असून यांमुळे पर्यटन पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेने घरपट्टी मध्ये निदान ५० % सूट देऊन हॉटेल व्यवसायाला मदत करावी, अशी मागणी महेश जावकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page