राजिनामा म्हणजे राणें विरोधात बंड नव्हे

नारायण राणेंचा मी पहिल्या पासून चाहता;ती नाराजी आहे:म्हापसेकर यांची पत्रकार परिषद

सिंधूदुर्गनगरी ता ३१       मी नारायण राणेंचा पहिल्या पासून चाहता आहे. त्यांच्या सारखे नेतृत्व कोकणला हवे, अशी माझी कायम इच्छा आहे. तसेच राणेंना भाजप पक्षात घ्यावे, अशी माझी गेल्या पाच वर्षापासून मागणी होती. त्यामुळे मी पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देवून राणें विरोधात बंड केले आहे, असे नाही. तर अनिशा दळवी यांना सभापती पद देवू नये, अशी आमच्या ३० ही सदस्यांची मागणी होती. आपल्यालाही तो निर्णय पटलेला नाही. त्यामुळे आपण राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र म्हापसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.          २६ रोजी झालेल्या सभापती निवडी वेळी नाराज होवून उपाध्यक्ष पदासह सदस्य पदाचा राजिनामा दिल्यानंतर म्हापसेकर हे प्रथमच मिडियाशी बोलले. यावेळी त्यांनी आमच्या पक्षात जुने-नवीन वाद नाहीत. उलट मला राणे यांच्या समवेत आलेले कार्यकर्ते जवळचे वाटतात. कारण त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे जनतेची कामे होत आहेत. आम्ही भाजप कार्यकर्त्यांनी नेहमी शिवसेनेचा झेंडा घेवून काम केले. आम्हाला एखादी जिल्हा परिषद व पंचायत समितीची उमेदवारी मिळायची. त्यावेळी भाजप जिल्ह्यात एक नंबरला हवा, असे नेहमी वाटायचे. ती इच्छा राणे आमच्या पक्षात आल्याने आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे अशा नेत्या विरोधात बंड करण्याचा प्रश्नच नाही. केवळ ‘तो’ आवडला नसल्याने माझ्या मनाला पटला म्हणून घेतलेला तो निर्णय आहे, असे सांगितले.        पुढे बोलताना म्हापसेकर यानी, राणे यांच्यावर आपले नितांत प्रेम आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या हिताचा असू शकतो. परंतु तो आपल्याला पटला नाही, म्हणून हा निर्णय आपण घेतला. आपण समाधानी आहोत. दुसऱ्याला जबाबदारी सोपवा, अशी आपण पक्षश्रेष्ठी यांच्याकडे यापुर्वीच मागणी केली होती. त्यानुसार आपण राजीनामा दिला आहे. नवीन सदस्याला संधी मिळावी, या हेतुने राजिनामा दिलेला आहे. कोणत्याही सदस्याला ही संधी दिली तरी आपली नाराजी असणार नाही. उर्वरित २५ पैकी कोणालाही संधी द्यावी, यात आपला काही नाराज होण्याचा प्रश्न नाही. आपण उपाध्यक्ष पदाचा राजिनामा मागे घेणार नाही. तसेच माझ्या सदस्य पदाचा राजिनामा स्वीकारावा, अशीही माझी मागणी आहे, असे सांगत म्हापसेकर यानी आपण दोन्ही राजीनाम्यावर ठाम असल्याचा पुन्हा उच्चार केला. मात्र, आपण नारायण राणे तथा भाजपावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले. 

You cannot copy content of this page