वीजेची समस्या न सुटल्‍यास आंदोलन तीव्र छेडणार…

सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेचा इशारा; कणकवलीत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठक

⚡कणकवली ता.२९-: अवकाळी पाऊस, वादळ यामुळे जिल्ह्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. यात व्यापारी वर्गाचे व ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. येत्‍या पाच दिवसांत सर्व वीज समस्या सोडविण्याची कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने देण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्‍हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष दादा कुलकर्णी यांच्यासह व्यापारी संघाचे नितीन वाळके, राजेश राजाध्यक्ष, महेश नार्वेकर, ॲड.नितीन म्‍हापणकर, ॲड.नंदन वेंगुर्लेकर, संजय गोरुले, समीर म्‍हाडगुत, विलास कोरगावकर आदींनी महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची भेट घेतली. भेटीदरम्यान खंडित होणाऱ्या वीज समस्यांवर सकारात्‍मक चर्चा झाली. वीज समस्या मार्गी लावण्याबाबत महावितरण विविध उपाययोजना करणार असल्याची ग्वाही बाळासाहेब मोहिते यांनी दिल्‍याची माहिती नितीन वाळके यांनी दिली. मात्र खंडित वीज पुरवठ्याची समस्या पुन्हा निर्माण झाली. तर वीज ग्राहक संघटनेच्यावतीने मोठे आंदोलन केले जाणार आहे, असे श्री.वाळके सांगितले.
दरम्‍यान, तीन तासांपेक्षा जास्त काळ वीज पुरवठा बंद राहिला तर ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. त्‍यानुसार ज्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा तीन तासांपेक्षा अधिक काळ खंडित झाला असेल अशा ग्राहकांनी नियामक आयोगाकडे अपील करावेत. त्‍यासाठी वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून ॲड.नंदन वेंगुर्लेकर, ॲड.नितीन म्‍हापणकर ग्राहकांची बाजू मांडतील, असे वाळके यांनी सांगितले.
तिलारीसह दोडामार्ग तालुक्‍यात धरणाच्या पाण्यावर ४० मेगावॅटपेक्षा जास्त वीज निर्मिती होती. यातील ९५ टक्‍के वीज ही कर्नाटक राज्‍यात पाठवली जाते. ही वीज सिंधुदुर्गला मिळावी अशीही आमची मागणी असल्‍याने ॲड.नितीन म्‍हापणकर यांनी सांगितले. दरम्‍यान मालवण शहराला कुडाळ येथून वीज पुरवठा होतो. ही ३३ केव्हीची वीज वाहिनी भूमिगत होणार आहे. येत्‍या १८ महिन्यांत हे काम पूर्ण होईल. भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्ण झाल्‍यानंतर मालवणला वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार निश्‍चितपणे थांबतील, अशी माहिती बाळासाहेब मोहिते यांनी दिलेच्या संघटनेच्या पदाधिकारी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page