मुख्याधिकारी कंकाळ: वेंगुला नगरपरिषद व टीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यशाळेचे शानदार उद्घाटन..
⚡वेंगुर्ला ता.२८-: टिम फाऊंडेशनच्या माध्यमातून आपल्याला जे व्यासपिठ मिळाले आहे ते बचतगटाचे उत्पादने विक्री करण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहेत. यातून मार्केटींगचा प्रश्न सुटला तर आर्थिक उन्नती होऊन ख-या अर्थाने महिलांचे सबलीकरण होणार आहे. त्याचबरोबर बचतगटांच्या अडचणी सोडविण्यासाठी नगरपरिषद त्यांच्या पाठीशी राहिल असे आश्वासन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी दिले.
महिला बचतगटातील उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे व इतर गटातील उत्पादन मालाची विक्री करून उत्पन्न वाढविणे यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद येथे नुकतीच उद्योजक महिलांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.
दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या बचतगटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद व टिम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद येथे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. याचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर परिविक्षाधिन मुख्याधिकारी श्री.थोरात, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, टिम फाऊंडेशनचे आयटी सेलचे प्रमुख चंद्रशेखर देशमुख, सचिन मारे, दिपु टांक, एनयुएलएम सावंतवाडीचे व्यवस्थापक एकनाथ पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे आदी उपस्थित होते.
जे गट उत्पादन करतात त्यांच्या उत्पादनांची पडताळणी व उत्पादने कमीशन बेसीसवर विक्री करण्यास ज्या महिला उत्सुक आहेत त्यांची नोंदणी करण्यात आली. याबाबत टिम फाऊंडेशनचे आयटी सेलचे प्रमुख चंद्रशेखर देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सीएलसी ऐश्वर्या सावंत यांनी मानले.
फोटोओळी – उद्योजक महिलांसाठीच्या कार्यशाळेत मुख्याधिकारी कंकाळ यांनी मार्गदर्शन केले.
