⚡कणकवली ता.२६-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीने नाले, गटारे सफाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत तेलीआळी परिसरातील गटारातील कचरा बाहेर काढून तो गेले चार दिवस रस्त्यालगत ठेवण्यात आला होता. अखेर रविवारी सकाळी सदर कचर्याची न. पं. च्या सफाई कामगारांनी उचल केली.
पावसाळ्यात गटारे तुंबून पाणी निचरा होण्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून शहरात नाले, गटारे सफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात शहरातील बहुतांश भागातील नालेसफाईची कामे पूर्ण झाली आहेत. शहर बाजारपेठ आणि राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणार्या तेलीआळी भागातील गटार 4 दिवसांपूर्वी उपसण्यात आले. मात्र, गटारातील कचरा रस्त्यालगत ठेवण्यात आला. त्याचा त्रास नागरिकांसह वाहन चालकांना होत होता. सध्या मॉन्सूनपूर्व पाऊस पडत आहे. जर मोठ्या सरी कोसळल्या तर रस्त्यालगतचा करचा पुन्हा गटारात जाणार असल्याने तेलीआळी परिसरातील कचरा उचलावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या मागणीची नगरपंचायत प्रशासनाने दखल घेत रविवारी सकाळी सफाई कामगारांनी रस्त्यालगत ठेवलेला कचर्याची उचल केली. दरम्यान, कचराप्रश्नी न. पं. च्या स्वच्छता विभागाचे निरीक्षक विनोद सावंत यांना विचारले असता सध्या शहरात नाले, गटारे सफाईची कामे न. पं. कडून युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे तेलीआळी परिसरातील रस्त्यावरील कचरा उचलण्यास उशिरा झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
तेलीआळीतील रस्त्यावरील कचरा उचलला
