वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या छपरांची पडझड:नागरिकांची उडाली धावपळ..
⚡मालवण ता.२२-: आज सायंकाळी आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने मालवणवासीयांना अक्षरशः झोडपून काढले . जोरदार पर्जन्यवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या छपरांची पडझड झाली असून झाडे वीज पोल यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या लखलखटामुळे घरगुती विजेची साहित्य, इन्व्हर्टर, जनरेटर यांची मोठी नुकसानी झाली असून या वादळी पावसाने मालवणातील वीज पुरवठा खंडित झाल्याने मालवण शहर आणि परिसर अंधारात बुडून गेले आहे.
गेले काही दिवस जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पाऊस कोसळला असताना मालवणात पावसाचा टिपूस नव्हता या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. आज सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन हवेत गारवा पसरला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आकाश काळ्या ढगांनी भरून येऊन सोसाट्याचा वारा सुटला. वाऱ्याचा जोर मोठा असल्याने सर्वत्र धूळ व पालापाचोळा उडू लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली. यानंतर वाऱ्यासह पावसाने उग्र रूप धारण करत मुसळधार सरींनी अक्षरश: झोडपून काढले.
वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फ़ांद्या, माडांची झावळे तुटून पडली. तर काहींच्या घराचे पत्रे व कौले उडून गेली. तसेच छप्परावर झाडाच्या फ़ांद्या, झावळे व नारळ पडूनही मोठे नुकसान झाले. तसेच वाऱ्यामुळे वीज वाहिन्या तसेच काही ठिकाणी वीज पोलही तुटून पडले. वादळी वारा व पावसामुळे मालवणातील वीज पुरवठा देखील रात्री उशिरापर्यंत खंडीत झाला होता. कोथेवाडा चिवला बिच येथील अनंत मारुती मयेकर यांच्या मालकीचे नारळाचे झाड वादळी वाऱ्याने उन्मळून पडल्याने घराचे थोडेफार नुकसान झाले आहे.
