गजल सागर प्रतिष्ठान व अखंड लोकमंचतर्फे कणकवलीत कार्यशाळेचे आयोजन..
⚡कणकवली ता.२३-: गजल सागर प्रतिष्ठान मुंबई व अखंड लोकमंच कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथील नगरवाचनालय सभागृहामध्ये नुकतीच गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशीय गझल लेखन व गायन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला महाराष्ट्र व गोव्यातून विविध गजल लेखक व गजल आवड असणार्या श्रोत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी मान्यवरांबरोबरच अखंड लोकमंच सिंधुदुर्गचे अध्यक्ष नामानंद मोडक उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये गजल लेखनातील विविध पैलूनुसार गजलेचे होणारे लेखन याविषयी पांचाळे यांनी मार्गदर्शन केले. सकाळच्या सत्रात त्यांनी गझल लेखनाविषयीचे विविध पैलू उलगडून दाखवले. गझल लेखन ही साधी, सरळ व सोपी गोष्ट नसून गजल लेखनामध्ये टतस्थपणा आवश्यक आहे. माणसाच्या जीवनातील सुखाच्या अनुभवांबरोबरच वेदनांचे विविध पट गजलेतून उलगडून दाखवले जातात. जगण्याच्या संदर्भातील साध्या साध्या गोष्टीही गझल लेखनातून काळजाला भेदून जाऊ शकतात याविषयीच्या अनेक शायर्या पांचाळे यांनी म्हणून दाखवल्या.संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सुमधुर आणि भारदस्त आवाजामध्ये पांचाळे यांनी गजल गायनाचे अनुभव पेश केले.श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायला लावणारा हा गजल लेखन व गायनाचा दिवस श्रोत्यांच्या सार्थकी लागल्याचा अनुभव अनेकांनी व्यक्त केला.
पांचाळे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मराठी गजलेचा इतिहास, मराठी गजलेचा प्रवास याबाबत सविस्तर माहिती कथन करून गजललेखन करताना सांभाळावयाची पथ्ये, गजलेचा छंद, गजलेचे व्याकरण आदी अतिशय मौलिक माहिती दिली. हे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे देऊन आणि त्या अनुषंगाने प्रत्यक्ष गजल गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मराठी गजलेचा इतिहास कथन करताना त्यांनी माधव ज्युलियन यांनी मराठी गजलेचा पाया घातला असून जेष्ठ कवी सुरेश भट यांनी गझलेला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि माधव ज्युलियन यांनी केलेल्या कार्यावर त्यांनी खर्या अर्थाने कळस चढविला हे भीमराव पांचाळे दादांनी नमूद करून हेच कार्य गजल सागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पुढे नेत आहोत असे त्यांनी सांगितले. चांगले गजलकार निर्माण होण्यासाठी अधिकाधीक गजल लेखन आणि गायन कार्यशाळा घ्यायला हव्यात असे त्यांनी आवर्जून सांगितले. मराठीमध्ये सध्या 900 हून अधिक गजलकार उत्तम गजल लिहित असून ही संख्या भविष्यात आणखी वाढेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गातील आघाडीचे गजलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंतीदिनी ही कार्यशाळा कणकवलीत संपन्न होत आहे. हा सुद्धा सुयोगच असून मधुसूदन नानिवडेकर हे गजलकार आणि एकंदरीत माणूस म्हणूनही मोठे व्यक्तिमत्त्व होते हे नमूद करून त्यांनी नानिवडेकर यांना श्रध्दांजली वाहिली. अखंड लोकमंचातर्फे भीमराव पांचाळे सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मोहन कुंभार यांनी केले.
पुणे, रत्नागिरी, मिरज, सांगली आणि गोव्यासह सिंधुदुर्गातील गजल लिहिणार्या अनेक नवोदित आणि प्रथितयश गजलकारांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून पांचाळे चया मार्गदर्शनाचा लाभ घेतला. ही कार्यशाळा घेण्यासाठी कणकवली येथील अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, मोहन कुंभार, संतोष कांबळे, रूपाली कदम, शैलजा कदम, कल्पना मलये, संतोष कांबळे, अभिनेते नीलेश पवार, विनायक सापळे, राजेश कदम आदींनी मेहनत घेतली.
