डॉ शिनगारे:रोटरी क्लब मँगो सिटी देवगड व डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वतीने केले होते आंबा चर्चा सत्राचे आयोजन..
⚡देवगड ता.२२-: देशात २५ लाख हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड असून त्यामध्ये कोकणात १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड आहे. राज्यातील आंबा लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र कोकणात आंबा लागवडीसाठी व्यापले आहे. मागील काही वर्षात आंबा उत्पादनावर खूप परिणाम झाला आहे. त्याला एकमेव कारण म्हणजे बदलते हवामान आहे. मोठ्या प्रमाणात वाढते तापमान, बदललेला पाऊस पडण्याचा हंगाम आणि वर्षभर पडणारा पाऊस थंडीच्या प्रमाणात होणारे चढ-उतार यामुळे आंबा हंगाम लांबणीवर जात आहे. त्यातच आंबा पिकांवर कीटकनाशकांचा प्रादुर्भाव जास्त होत असल्याने फळमाशीचा प्रादुर्भाव मागील काही वर्षांपासून खूपच वाढला आहे. फळमाशी वर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्षक सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्यात माशीला आकर्षित करण्यासाठी जे औषध आहे ते बागातदारांनी दर्जेदार घेतले पाहिजे. सर्व बागायतदारांनी दर्जेदार औषध सापळ्यात ठेवले तर फळ माशीवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार आहे .असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ प्रकाश शिनगारे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे आंबा बागायतदारांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रकाश शिनगारे, संशोधन संचालक यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुरेंद्र पतंगे (सहयोगी अधिष्ठाता काढणी पश्चात व्यवस्थापन महाविद्यालय रोहा) डॉ केतन चौधरी( विस्तार शिक्षण विभाग प्रमुख) डॉ सुरेश नाईक, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट प्रवीण पोकळे सचिव विजय डांबरी विजय बांदिवडेकर, नरेश डामरी, तालुका कृषी अधिकारी प्रदीप खाडे, आदी उपस्थित होते.
डॉ शिनगारे मार्गदर्शन करताना म्हणाले की, राज्यातील एकूण सरासरी आंबा उत्पन्नापैकी ८० टक्के आंब्याचे कोकणात उत्पादन होते .इतर फळाप्रमाणेच आंबा बोर्ड कोकणात निर्माण व्हावी अशी कोकणातील बागायतदारांची प्रमुख मागणी आहे .याबाबत शासन स्तरावरून प्रक्रिया सुरू आहे. बोर्डाच्या माध्यमातून आंबा फळाविषयी असलेले प्रश्न सोडविता येतील व अनेक सुविधा उपलब्ध करता येतील. आंबा पिकांवरील नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे .
थ्रीप्सवर नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचा अतिवापर झाल्यामुळे थ्रीपचे जीवनशैलीत बदल झाला आहे .प्रतिकारशक्ती वाढली आहे त्यामुळे थ्रीप्स मध्ये वाढ होताना दिसत आहे. विद्यापीठांमध्ये यावर संशोधन सुरू आहे .आंबा उत्पादन जास्तीत जास्त होण्यासाठी अन्यद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन महत्त्वाचे आहे यातूनच आंबा उत्पादन चांगले होईल असेही शिनगारे म्हणाले.
आंबा लागवड तंत्रज्ञान आणि पुनर्जीवन या विषयावर मार्गदर्शन करताना कोकणातील आंबा उत्पादन हे एकाच जातीचे घेतले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात परिणाम होत आहे.परागिकरणाची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हापूस बरोबर इतर जातीच्या आंबा झाडांची लागवड केली पाहिजे. कोकणात आंबा उत्पादकता सुमारे अडीच ते तीन टक्के हेक्टरी अशी आहे. राज्यात आंब्याचे प्रमाण आंब्याचे उत्पादन पाच टन हेक्टर एवढे आहे.हापूसचे एकाच जातीचे उत्पादन जास्त होते अन्य जातीचे फळ उत्पादन झाले पाहिजे असे यावेळी डॉ किरण मालशे यांनी सांगितले.
डॉ. ए वाय मुंज यांनी आंबा कीड व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी विविध प्रादुर्भाव ठरत असलेल्या कीटकांची माहिती दिली. तसेच त्या किटकांवर उपाययोजना करण्यासाठी कीटकनाशक वापरातबाबत माहिती दिली. आतापर्यंत आंबा पिकांवर १८५ किडींची नोंद झाली आहे. फार पूर्वीपासून कीटकांचा प्रादुर्भाव होत आहे. आता त्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. थ्रीप्सवर औषध उपलब्ध नसून त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. तुडतुडे, थ्रीप्स,फळमाशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मान्यता प्राप्त औषधांची फवारणी नियमा नुसार झाली पाहिजे. वेगवेगळी औषधे मिश्रण करून त्याची फवारणी होत असेल तर आपणचं कीटकांच्या वाढीसाठी जबाबदार ठरत आहोत.त्याच त्याच औषधांची दोन दोनदा फवारणी केल्यामुळे थ्रिप्सचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो वाढतो.यासाठी विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या औषधांची फवारणी वेळापत्रकानुसार झाली पाहिजे. अती औषध फवारणी पिकांसाठी परिणामकारक होत आहे. असे त्यांनी सांगितले तर डॉ. एस बी स्वामी यांनी आंबा काढणी आणि काढणी पश्चात व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच देवगड तालुक्यातील आंबा बागायतदार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ केतन चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनस्वी घारे यांनी केले.
