गार्डनच्या विकासाकडे न. प. प्रशासकाचे दुर्लक्ष:महेश कांदळगावकर यांची टीका..
⚡मालवण ता.२०-:
मालवणातील पर्यटनाचे एक आकर्षण असलेल्या रॉक गार्डन मध्ये वीज पुरवठा सध्या बंद असल्याने पर्यटकांना काळोखातच गार्डन फिरावे लागत आहे. तसेच गार्डन मधील म्युझिकलं फाउंटन, लहान मुलांची खेळणी, बोटिंग आदी अनेक गोष्टी बंद असून यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. रॉक गार्डनसह मालवण शहर विकासाच्या प्रत्येक बाबतीत मालवण नगरपालिकेच्या प्रशासकाची अनास्था दिसून येत आहे विकास कामांकडे प्रशासक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर सध्या लोकप्रतिनिधीच्या गैरहजेरीत प्रशासकावर अंकुश ठेवणार कोण ? असा टिकात्मक सवाल मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
मालवणात सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून असंख्य पर्यटक रॉक गार्डनला पसंती देत भेट देत आहेत. लोकप्रतिनिधीनी आपापल्या कालावधीमध्ये या रॉक गार्डनची प्रसिद्धी वाढविण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आमच्या कालवधीमध्ये कोकण पट्ट्यात नाही असा एकमेव म्युझिकल फाउंटन या रॉक गार्डनमध्ये बसविण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खेळणी, बोटिंगची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांचीबरोबर स्थानिकांची देखील पसंती आहे. मात्र या गार्डनच्या देखभाल दुरुस्तीकडे बघायला सध्या नगरपालिकेच्या प्रशासकाकडे वेळ नाही. सध्या मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक असताना रविवार सारख्या दिवशी गार्डनमधील लाईट बंद, म्युझिकल फाउंटन बंद अशी परिस्थिती आहे. गार्डन बघायला येणाऱ्या व्यक्ती कडून पाच रुपये प्रवेश फी घेतली जाते ज्या पासून नगरपालिकेला लाखो रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे, असा तिकीट काउंटर देखील रविवार सारख्या दिवशी बंद ठेवला जातो. गार्डनमधील बोटिंग मागील दोन अडीज वर्षे बंद आहे. टॉयलेट व्यवस्था अपुरी पडत असल्याने याठिकाणी आमच्या कालावधीत सुमारे २५ लाख खर्च करुन घेण्यात आलेल्या पाच गाड्यांपैकी पैकी एक गाडी आणून ठेवण्याबाबत दोन वर्षापासून सुचित करूनही कुठलीही कार्यवाही नाही. हे सगळं म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातंय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशी टीका महेश कांदळगावकर यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधीनी सूचना करूनही शहर विकासाच्या कुठल्याही बाबतीत प्रशासकाची अनास्था आहे. त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही हेच अधोरिखित होत आहे. लोकप्रतिनिधी आपापल्या क्षमतेप्रमाणे आपल्या शहराचा विकास होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात पण ज्याना कोणाला शहराच्या विकासाचे काही देणे घेणे नसते, असा एखादा अधिकारी विकासकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन जर शहराची वाट लावत असेल तर त्याच्यावर लोकप्रतिनिधीच्या गैरहजेरीत कोण अंकुश ठेवणार हा एक प्रश्न निर्माण झाला आहे, असेही महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.
