मालवण तालुक्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांची तहसीलदारांकडून पाहणी…

⚡मालवण ता.१८-:
येत्या पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील दरडग्रस्त भागांची आणि पूरग्रस्त भागांची पाहणी तहसीलदार वर्षा झालटे यांनी केली. तसेच आवश्यक त्या ठिकाणी करावयाच्या उपयायोजनांबाबत माहिती संबंधित प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांना दिली.

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केलेल्या सूचनांनुसार सदरची पाहणी करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्यासमवेत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे तसेच इतरही विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.

यावेळी दरडप्रवण गावांवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करुन दरड कोसळून कोणत्याही प्रकारची जीवित हानी होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशा सूचना देण्यात आल्या. सर्व दरप्रवण गावांचे सर्वेक्षण करुन सदर दरडीमुळे बाधित होणारी कुटुंब संख्या व लोकसंख्या यांची अद्यावत माहिती तहसील कार्यालयात सादर करण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सन २०१९-२० व सन २०२१-२२ च्या पावसाळ्यात दरडग्रस्त झालेल्या गावांमध्ये मालवण चिंदर तेरईवाडीबाधित कुटंबे २, बाधित व्यक्ती ५ यांचा समावेश आहे. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांमध्ये कांदळगाव स्थळकरवाडी, गोळवण वरचीवाडी, गावठणवाडी, खालची गावडेवाडी २ यांचा समावेश आहे. पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये मसुरे मर्डे कावा, सय्यद जुवा, मसुरे डांगमोडे मर्डे उसलाटवाडी, मर्डे टोकळवाडी, खाजनवाडी, बांदिवडे बुद्रुक, मळावाडी, शीळवाडी, कोरेवाडी, पालववाडी, माळगाव, बागायत, चिंदर अपराजवाडी या गावांचा समावेश आहे. दरडप्रवण गावांची अद्ययावत कुटुंबे संख्या व लोकसंख्या या कार्यालयास कळविण्यात यावीत. सदर गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन बैठकांचे आयोजन करावे. दरड कोसळण्याच्या बाबतीत लोकांमध्ये आवश्यक ती जनजागृती करावी. दरडीमुळे बाधित होणारी अन्य गावे असतील तर त्यांची देखील माहिती सादर करावी, असेही निर्देश यावेळी तहसीलदार यांनी दिले.

You cannot copy content of this page