⚡देवगड ता.१६-: दहिबाव नळयोजनेवर एका मागून एक संकट येत असतानाच आता या योजनेच्या जलस्त्रोतातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने देवगड जामसंडे वासियांचा पाणी प्रश्न पुन्हा गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. सात दिवसापूर्वीच पंपिंग यंत्रणेत झालेला तांत्रिक बिघाड व त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीबाव कुपलवाडी येथे जलवाहिनी फुटल्याने देवगड जामसंडे चा पाणीपुरवठा सात दिवस बंद होता.
दरम्यान जलवाहिनी व पंपीग यंत्रणा दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.मात्र सद्यस्थितीत जलस्रोतातील पाण्याची पातळी घटत चालली आहे. गतवर्षी नगरपंचायतीने नदीपत्रातील गाळ काढला . त्यामुळे पाण्याची पातळी वाढली होती. मात्र यावर्षी उष्णतेचा वाढता जोर यामुळे पाण्याची पातळी घटत चालली आहे .हा देवगड व जामसंडे वासियांचा चिंचेचा विषय बनला आहे. सध्या नागरिकांना वारेमाप पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. सुट्टीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक देवगड जामसंडेत दाखल झाले आहेत. अशा स्थितीत पाण्याची अवस्था गंभीर बनल्याने नागरिकांसमोर पाणी समस्या हा एकच विषय उभा ठाकला आहे. पाऊस न पडल्यास पाणी प्रश्न आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत. यामुळे प्रशासनाबरोबरच नागरिक ही पावसाकडे डोळे लावून बसले आहेत.
नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी पाणी पातळी समाजाची घटक असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तरीही शिरगाव पाडाघर योजनेवरून जास्तीत जास्त पाणी उचलून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा असे नियोजन सुरू आहे सध्या पाणीटंचाईच्या कालावधी असल्याने दोन दिवस आड करून पाणीपुरवठा केला जात आहे मात्र पाऊस सुरू होईपर्यंत नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत असे नगराध्यक्ष यांनी सांगितले
