महालक्ष्मीची विज न मिळाल्यास गाठ आमच्याशी ; नगराध्यक्ष चेतन चव्हाणांचा इशारा..
दोडामार्ग : वैभव साळकर
सतत तीन दिवस ५० तासांहून अधिक काळ तालुका अंधारात असताना अधिकारी मात्र केवळ खुर्च्या गरम करण्याचे काम करीत असल्याने संतापलेल्या नागरिकांच्या संतापाचा सोमवारी कडेलोट झाला.सतत तीन दिवस काळोखात काढणाऱ्या नागरिकांनी कसई- दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विज कार्यालयात धडक देत उपविभागीय अभियंता नलावडे याना धारेवर धरले.महालक्ष्मी ची विज तालुक्याला मिळावी यासाठी संपलेल्या कराराचे नूतनीकरण पावसाळ्यापूर्वी करा . आम्ही पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करू अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा सज्जड इशाराही दिला. दोडामार्ग तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे.शनिवारी केवळ १५ मिनिटे तालुक्यात पाऊस झाला.मात्र त्यानंतर संपूर्ण रात्र तालुकवासीयांना काळोखात काढावी लागली. दुसऱ्या दिवशी रविवारीही तीच परिस्थिती राहिली .काही काळ वीज आली आणि गेली ती पुन्हा आलीच नाही.मग रात्रौ उशीरा कोनाळकट्टा परिसरात महालक्ष्मी ची वीज देण्यात आली परंतु निम्म्याहून अधिक तालुका काळोखातच राहिला परिणामी अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले.इन्सुलि ते सासोली ही ३३ के.व्ही ची विद्युत लाईनमध्ये बिघाड असल्याचे कारण देण्यात आले.मात्र खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.पण त्याचा नाहक फटका नागरिक , व्यापारी आदींना सहन करावा लागला.मात्र हा विजेचा खेळखंडोबा सुरू असताना विद्युत वाहिन्यांवरील झाडी तोडण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे स्थानिकांना जाणवले त्यामुळे केवळ खुर्च्या गरम करण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जी कारभाराविरोधात नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला.आणि तालुक्यातील अनेक गावातील सरपंच , नागरिक , लोकप्रतिनिधी , व्यापारी आदींनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली येथील उपविभागीय वीज कार्यालयावर धडक दिली आणि अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.गेले तीन दिवस तालुक्यत वीज नाही नागरिक हैराण झाले आहेत पण तुम्ही मात्र केबिनमध्ये केवळ हातावर हात धरून बसलात .आम्ही रात्रभर जागरण करून वाहिन्यांवर पडलेल्या फांद्या तोडतो पण तुम्ही मात्र पावसाळा तोंडावर आला तरी ही कामे पूर्ण केली नाहीत.त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला तुम्हीच जबाबदार आहात असा आरोप केला.शिवाय महालक्ष्मी ची वीज देण्यासंदर्भातिल करार संपून वर्ष झालं तरी तो पुन्हा नूतनीकरण करण्यासंदर्भात अद्याप का कारवाई केली नाही ? शिवाय ही बाब पालकमंत्र्यांच्या कानावर का घातली नाही ? याचा जाब विचारला.यावर समर्पक उत्तर वीज अधिकारी देऊ शकले नाही .पावसाळ्यपूर्वी महालक्ष्मी ची वीज मिळावी यासाठी लागणारी कार्यवाही करा पालकमंत्र्यांकडे आम्ही पाठपुरावा करू पण या कामात हयगय करू नका अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा सज्जड इशाराही दिला चौकट – तब्बल ५० तास तालुका अंधारात – गेल्या तीन दिवसात मिळून तब्बल ५० तास तालुका अंधारात राहिला. त्याचा विपरीत परिणाम व्यापाऱ्यांवर झाला .दूध व आईस्क्रीम विक्रेत्यांचे अतोनात नुकसान झाले. तर तालुक्यातील बँकांचे कामकाजही बंद पडले होते फोटो – नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी वीज अधिकाऱ्यांना फैलावर घेतले
