मुंबई प्रचारात सतीश सावंत यांचा सहभाग..
कणकवली ता.१३-: देशभरामध्ये मोदीविरोधी लाट स्पष्टपणे दिसू लागली आहे. मुंबई शहरांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सहा ही जागा निश्चितपणे निवडून येणार असून दक्षिण मुंबई मतदार संघातून लोकसभेसाठी पुन्हा एकदा अरविंद सावंत हे खासदार पदाची हॅट्रिक करतील, असा दावा शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे.
मुंबईमध्ये २० मे रोजी मतदान होत आहे या निमित्ताने मुंबईतील शिवडी, गिरगाव, ठाकूरदार, गायवाडी, ग्रँटरोड, कुलाबा या मतदारसंघांमध्ये रविवारी सतीश सावंत यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर खासदार अरविंद सावंत यांच्या प्रचार रॅलीमध्येही सहभाग घेतला. यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, भाई सावंत, मुंबई दक्षिण विभागातील शिवसेनेचे आजी-माजी आमदार, शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी, विभाग प्रमुख शाखाप्रमुख, महिला बूथ प्रमुख असे विविध कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होते .
रविवारी सकाळपासूनच शिवसेना शाखा २०२ पासून या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. रात्री उशिराने गिरगाव मध्ये या रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सतीश सावंत म्हणाले, मुंबईमध्ये शिवसेना पक्षासाठी पोषक वातावरण आहे. ज्या ज्या कुटुंबांमध्ये जाऊन भेटी घेतल्या. त्यांचा सकारात्मक विचार शिवसेनेच्या बाजूने आहेत. शिवसेना फुटून गद्दारी झाल्याचा राग मुंबईतील जनतेमध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी आणि मुंबई विरोधात सुरू असलेल्या राजकारणाला कायमस्वरूपी बाहेर फेकून देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी मुंबईतील प्रत्येक मराठी माणूस सोबत असल्याचे चित्र या खेपेस पाहायला मिळाले आहे. मराठी माणसांसह मुंबईत राहणारा अमराठी नागरिकही शिवसेना उद्धव ठाकरे गटा बरोबर आहे असा दावाही सतीश सावंत यांनी केला आहे. दक्षिण मुंबई मतदार संघामध्ये ज्या ज्या परिसरामध्ये आम्ही गाठीभेटी घेतल्या. तेथे सकारात्मक चर्चा झाल्या आहेत. विविध मंडळे, निवासी संकुलने, कोकणातील विविध गावातील ग्रामीण मंडळातील अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारिणीची भेट घेऊन अरविंद सावंत यांना थेटपणे मतदान करण्याचे आवाहन आम्ही केले. त्याचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक जण शिवडीपासून गिरगावपर्यंतच्या रॅलीमध्ये ही सहभागी झाले होते. सिंधुदुर्गातील मराठी माणूस हा अरविंद सावंत यांच्या मागे कायम आहे आणि तो याही खेपेस राहील असा विश्वासही श्री. सावंत यांनी व्यक्त केला आहे.
