रेडियम कटरने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर…

⚡कणकवली ता.१०-: कणकवली शहरातील सिद्धार्थनगर येथील गौतम हिंदळेकर याच्यावर पूर्ववैमनस्यातून कटरने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शहरातील माऊलीनगर येथील महेंद्र गोपाळ चव्हाण याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. १० फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ११.३० वा.च्या सुमारास शहरातील माऊलीनगर येथील नागवे रोडवर फिर्यादी गौमत हिंदळेकर हा मित्र अल्पेश तांबेसह मोटारसायकलने ट्रॅव्हल बुकींगचे पैसे आणण्यासाठी जात होता. त्‍यावेळी पूर्ववैमनस्यातून समोरून ओमनी गाडीतून आलेल्या आरोपी महेंद्र गोपाळ चव्हाण याने हुल दिली. यामुळे फिर्यादी व साक्षीदार गाडीसह खाली पडले यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरून आपल्या खिशातील रेडियम कटरने गौतम हिंदळेकर याच्या छातीवर, पायावर, मांडीवर व पोटरीवर १९ घातक वार केले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गौतम याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आरोपी हा उपचारार्थ रुग्णालयात असल्याने १३ फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली. एका दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आरोपी सावंतवाडी कारागृहात होता. दरम्यान, त्याच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणी अंती न्यायालयाने ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर करताना साक्षीदारांवर दबाव आणू नये. सरकारी पुराव्यात ढवळाढवळ करू नये आदी अटी घातल्या आहेत.

You cannot copy content of this page