⚡बांदा ता.१७-: सरस्वती पूजन आणि नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भारतीय संविधानातील तरतुदी व केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीताचे शाळा सुटल्यानंतर सादरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन भाजपचे माजी बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत दाभोलकर यांनी आज बांदा शहरातील सर्व शाळांना दिले.
भारतीय संस्कृती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, तसेच नव्या पिढीमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हे निवेदन देण्यात आले. सरस्वती पूजन आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बांदा शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना हे निवेदन देऊन संपूर्ण वंदे मातरम् गीत सादर करण्याबाबत विनंती करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय गीताविषयी आदरभाव आणि राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा बाबा काणेकर आणि हेमंत दाभोलकर यांनी व्यक्त केली.

