Headlines

“पाऊस थांबला, आता तरी सत्ताधाऱ्यांनी सावंतवाडीतील खड्डे बुजवावे..

साक्षी वंजारी:एसी वाहनातून शहराचा आढावा घेण्यापेक्षा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करावी, नगराध्यक्षांना लगावला टोला..

⚡सावंतवाडी, ता. १७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यांची कामे करता येत नसल्याचे कारण देत कामे रखडली होती. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतली असून ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी केली आहे.

सावंतवाडी शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना या खड्ड्यांमधून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात कामे कधी सुरू होणार, असा सवाल साक्षी वंजारी यांनी उपस्थित केला आहे.

पावसाळा हे रस्त्यांच्या कामांना विलंब होण्याचे कारण होते; मात्र आता पाऊस थांबल्यानंतरही कामे रखडण्यामागचे कारण काय, असा सवाल ही वंजारी यांनी उपस्थित केला. सावंतवाडीच्या नगराध्यक्षांनी शहरातील सर्व २० प्रभागांत प्रत्यक्ष फेरफटका मारून रस्त्यांची स्थिती पाहावी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घ्यावा, अशी अपेक्षा वंजारी यांनी व्यक्त केली आहे . एसी वाहनातून शहराचा आढावा घेण्यापेक्षा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थिती पाहिल्यास नागरिकांच्या अडचणींची तीव्रता लक्षात येईल, असा टोला देखील त्यांनी यावेळी नगराध्यक्षांना लगावला.

You cannot copy content of this page