⚡ओरोस ता. ०९-: क्षत्रिय गडकरी मराठा समाजातील दळवी घराण्याचा गोंधळ उत्सव १४ मे रोजी मालवण तालुक्यातील आंबडोस व्हाळवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्षत्रिय गडकरी मराठा समाजातील दळवी घराण्याची आकार भवानी आंबडोस व्हाळवाडी येथील दळवी घरात वास्तव्यास आहे. तिचा गोंधळ उत्सव दळवी भावकी आयोजित करीत असतात. त्यानुसार १४ मे रोजी गोंधळ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त क्षत्रिय गडकरी मराठा समाजातील दळवी घराण्याचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. यानिमित्त ११ मे रोजी भवानीचे वास्तव्य असलेल्या घरात होमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर १४ रोजी गोंधळा दिवशी सकाळपासून कार्यक्रम सुरू होणार आहे. सकाळच्या सत्रात गोडे जेवण महाप्रसाद म्हणून दिला जाणार आहे. हा कार्यक्रम आटोपल्यावर दुपारी भक्ष्य देण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर कातरवेळी जोगवा मागण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर उपस्थित भाविक यांच्यासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
महाप्रसाद आटोपल्यानंतर प्रत्यक्ष गोंधळ कार्यक्रम सुरू होणार आहे. अंगणात भवानी मातेचा देव्हारा वाद्यांच्या नादात आणला जाणार आहे. तेथे गोंधळाची मांडणी केली जाणार आहे. त्यानंतर ओठी भरणे कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. पहिल्या माहेर वाशिनिंच्या ओठया भरून झाल्यावर भाविक आणि दळवी भावकीतील सुहासिनी ओट्या भरणार आहेत. तसेच दिवटीमध्ये तेल घालणार आहेत. रात्रौ १२ वाजता गोंधळी कथा सांगायला सुरुवात करणार आहेत. पहाटे पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा भवानी मातेचा उदो उदो करीत दिवटी विझविली जाणार आहे. यावेळी घरातील मयत व्यक्तींच्या नावाने दान सुद्धा केले जाणार आहे. यानंतर देव्हारा पुन्हा जागी आणला जाणार आहे. अशाप्रकारे गोंधळ उत्सव आयोजित करण्यात आला असून भाविकांनी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन दळवी भावकी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
