गतवर्षी कुक्कुट पाळत व्यावसायिक…यावर्षी यशस्वी उद्योजक

जिल्ह्यातील पहिले अंडी उबवणी केंद्र सुरु करणारे रोहित गावडे;जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध विकास अधिकारी डॉ दिलीप शिंपी यांचे गौरोद्गार

*💫कणकवली दि.२७-:* एक वर्षापूर्वी ज्या तरुणाकडे कुक्कुटपालन योजनेचा लाभार्थी म्हणून आम्ही पाहत होतो. तोच रोहित गावडे आज यशस्वी उद्योजक म्हणून आमच्या समोर उभा आहे हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील पहिले हॅचरी युनिट ( अंडी उबवणी केंद्र ) रोहितने सुरू करुन अनेकांना रोजगार देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. यापूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायासाठी जिल्ह्याबाहेरुन कोंबडीची पिल्ले आणावी लागत होती ती आता मालवण पेंडूर येथे उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचणार आहे आणि वाहतूकी दरम्यान होणाऱ्या पिल्लांच्या मृत्यूचेही प्रमाण कमी होणार आहे. पर्यायाने शेतकऱ्यांच्या फायद्याची टक्केवारी वाढणार आहे. पशुसंवर्धन विभाग, बॅंक, ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने एंप्लॉयी न राहता एंप्लॉयर कसं व्हाव याचा आदर्श रोहित गावडे याने सर्वांसमोर घालून दिला आहे. महिना ३० हजार अंड्यांची क्षमता असणारे आणि प्रति आठवडा पाच हजार ते ८ हजार पिल्लांच्या निर्मितीची क्षमता असलेले हे सिंधुदुर्गातील पहिले अंडी उबवणी केंद्र आहे. ” असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. डी.ए. शिंपी यांनी पेंडूर येथे हॅचरी युनिट ( अंडी उबवणी केंद्र ) च्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना केले. मालवण तालुक्यातील पेंडूर येथील प्रगत शेतकरी दीपक गावडे यांचे पुत्र रोहित गावडे यांनी सुरू केलेल्या हॅचरी युनिट चे उद्घाटन शुक्रवार दिनांक २६ मार्च रोजी डॉ. डी. ए. शिंपी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी डॉ. सौ. किर्ती शिंपी, स्टेट बॅंक शाखा कट्टा चे शाखाव्यवस्थापक कौशिक गावडे, सहव्यवस्थापक तुषार कदम, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती मालवणचे डॉ. तुषार वेर्लेकर , पेंडूर सरपंच सुनिता मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य सुमित सावंत, शैलेश परब, अश्विनी पेडणेकर, संदीप सावंत, पोईप कृषी पर्यवेक्षक व्ही. सी. चौधरी, माजी सरपंच संजय नाईक, डॉ. डी. व्ही . सावंत, संजय पेंडूरकर, सत्यवान सावंत, पप्पू नाईक आणि गावातील शेतकरी उपस्थित होते. त्याचप्रमाणे यावेळी सदर प्रकल्पाची माहिती देताना डॉ. तुषार वेर्लेकर यांनी अशी माहिती दिली की, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पशुसंवर्धन विभागामार्फत सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर सधन कुक्कुट विकास गट स्थापन करणे या योजनेअंतर्गत रोहीत गावडे यांनी सदर हॅचरी युनिट चालू केले असून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे, बचत गटांचा आर्थिक स्तर उंचावणे आणि पोषणस्तर उंचावणे हे प्रमुख उद्देश या उपक्रमाचे आहेत. अंडी उत्पादनासाठी बेंगलोर येथून पेरेंट युनिट साठी कावेरी व डीपी क्रॉस या जातीच्या १५०० कोंबड्यांची बॅच गावडे यांनी वाढवली आहे. येत्या १२ एप्रिल पासून रोहित गावडे यांच्या युनिट मधून दर आठवड्याला ४ हजार कावेरी व डी पी क्रॉस जातीची एक दिवसाची पिल्ले उपलब्ध होणार आहेत. दरम्यान उपायुक्त डॉ. शिंपी यांनी रोहितच्या अपार मेहनतीचे फळ म्हणून जिल्ह्यातील सुमारे ५५५ लाभार्थी महिला बचत गटांना परसातील कुक्कुटपालन योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत वाटप करण्यासाठी आवश्यक असलेल्या ३० हजार पिल्लांची ऑर्डर उद्घाटनादिवशीच दिली. त्यामुळे रोहित आणि दीपक गावडे यांच्या उत्साहात निश्चितच भर पडली आहे.

You cannot copy content of this page