खा. विनायक राऊत यांचे आव्हान : आपल्या हक्काचा खासदार म्हणून मला पुन्हा लोकसभेत पाठवा..
⚡कणकवली ता.०५-: रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली बारसू व नाणार गावात विनायक राऊत यांनी एक इंच देखील जमीन खरेदी केल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुरव्यानिशी सिद्ध करून दाखवावे, तसे न केल्यास राज यांनी बारसू व नाणार गावात जाऊन ग्रामस्थांची जाहीररित्या माफी मागावी, असे आव्हान रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांना दिले. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी राज ठाकरे हे कणकवलीत आले होते. राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी घेतलेल्या कणकवलीतील सभेत रिफायनरीचे दलाल व्यासपीठावर उपस्थितीत होते, अशी टीकाही त्यांनी केली.
येथील विजय भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. राऊत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उबाठा गटाचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, अतुल रावराणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख नीलम पालव-सावंत, संकेत नाईक, राजू राठोड, सचिन सावंत, सी. आर. चव्हाण, सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, नारायण राणे हे गेल्या 35 वर्षांत जिल्ह्यात आ पण अमुलाग्रह बदल केल्याचे सांगत आहेत. मात्र, जिल्ह्यात त्यांनी एक तरी उद्योग सुरु केला आहे का? कुडाळ एमआयडीतील भूखंड राणेंच्या समर्थकांनी खरेदी केले आहेत. राणे हे महसूलमंत्री असताना जिल्ह्यात वनसंज्ञाखाली असलेली 420 हेक्टर जमीन 4200 हेक्टर करून टाकण्याचे पाप त्यांनी केले आहे, असा आरोप राऊतांना केला. राणेंनी स्वतःचे पडवे येथे मेडिकल कॉलेज सुरु करून याठिकाणी उपचार घेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य रुग्णांची लूट सुरु केली आहे.
नारायण राणे यांचे राजकीय जहाज बुडायला लागले असून या जहाजाला आधार देण्यासाठी राज हे कणकवली आले होते. राणेंच्या प्रचारार्थ राज यांनी कणकवली सभा घेतली. या सभेत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माझ्या विरोधात गरळ ओकली. ही गरळ ओकण्याची स्क्रीप्ट राणेंनी राज यांना लिहून दिली होती. नारायण राणे हे लघू, सुक्ष्म व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री आहेत. या खात्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले लाभार्थी हे राणे आहेत. केंद्र सरकारमध्ये त्यांना वजनदार खाते मिळाले. मात्र, अडिच वर्षांत सिंधुदुर्गात एकही रोजगाराचा प्रकल्प ते आणू शकले नाहीत. राणेंनी आजवर भूषविल्या मंत्रीपदाचा वापर स्वार्थासाठी करून आपल्या कुटुंबाचा विकास करत जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले, असा आरोप त्यांनी केला.
नारायण राणेंचा आजवरचा इतिहास गुंडगिरी, रक्तरंजित राहिला आहे. राणे हा विकृती प्रवृतीचा माणूस आहे. 2014 नंतर आम्ही जिल्ह्यातील दादागिरी संपुष्टात आणली आणि 2024 पर्यंत जिल्ह्यात शांतता कायम राहिली. पंढरी आंबरेकर हा गुंड व दलाली प्रवृत्तीचा माणूस असून त्यांनी बारसू व नाणार याठिकणाच्या स्थानिकांच्या जमिनी कवडीमोलात खरेदी करून त्या जमिनी परप्रातियांना विकल्या आहेत. रिफायनरी हा कोकणचा विनाश करणार प्रकल्प आहे. हा प्रकल्प कोकणच्या माथी मारण्याचे काम दिल्लीश्वरांकडून केले जात असून त्याला मिंधे सरकारची साथ आहे. मात्र, हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असे राऊतांनी सांगितले. रिफायनरी प्रकल्प हवा असेल तर दिल्लीश्वरांना तो त्यांनी गुजरातला न्यावा. राज्यात गद्दार एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर राज्यात येणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळविले गेले. परिणामी राज्यातील बेरोजारांचा रोजगार हरवला, हे पाप मिंधे सरकारचे आहे. तात्कालीन पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी कोकणात रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी मला कोट्यवधी रुपयांची आमिषे दाखवली. मात्र, त्या आमिषांना मी बळी पडलो नाही.
लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ मागील अडीच महिन्यात गावसंपर्क अभियान, खळा बैठका, जि. प. मतदारसंघ निहाय बैठका घेऊन जनतेनेच्या समस्या व अडीअडचणी समजून घेतल्या आहेत. माझ्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी व कणकवली सभा घेतली तर आदित्य ठाकरे यांनी चिपळूण व सावंतवाडी सभा घेतली. मविआतील सर्व घटक पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने माझा घरोघरी जाऊन प्रचार केला. आता आपल्या हक्काचा खासदार म्हणून मला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन राऊतांनी केले.
