वर्षानुवर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश:पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून फिडर मंजूर..
⚡कणकवली ता.११-: कलमठ गावातील वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कलमठ गावासाठी स्वतंत्र फिडर मंजूर करण्यात आला असून, या नवीन फिडरचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कणकवलीसोबत कलमठ गावालाही होणारा त्रास कमी होणार असून, गावातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
कलमठ गावासाठी स्वतंत्र फिडर बसविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. स्वतंत्र फिडर नसल्यामुळे कलमठ आणि कणकवली या दोन्ही गावांचा वीजपुरवठा एकाच यंत्रणेवर अवलंबून होता. त्यामुळे एका ठिकाणी वीजपुरवठ्यात बिघाड झाल्यास त्याचा परिणाम दोन्ही गावांतील नागरिकांना सहन करावा लागत होता. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे ग्रामस्थांनी स्वतंत्र फिडरसाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता.
गतवर्षी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देऊन स्वतंत्र फिडरची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर कलमठसाठी स्वतंत्र नवीन फिडर मंजूर करण्यात आला. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर फिडर कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
कलमठ गावात अनेक शाळा असून, वीजपुरवठा खंडित झाल्याने शैक्षणिक कामकाजावरही परिणाम होत होता. तसेच घरगुती, व्यावसायिक आणि इतर दैनंदिन कामांनाही त्याचा फटका बसत होता. स्वतंत्र फिडरमुळे या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, श्रीधर नाईक चौक ते पटवर्धन चौक या दरम्यान भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. या कामासाठी येणारी नुकसानभरपाईची रक्कम कमी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे ओएसडी अजयकुमार सर्वगोड यांनी सहकार्य केले. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे नुकसानभरपाईची रक्कम कमी होऊन सुमारे १६ लाख रुपयांपर्यंत आली. त्यामुळे या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी आभार मानले.
नवीन स्वतंत्र फिडरमुळे वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी कमी होऊन कलमठ गावाला अधिक स्थिर वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. कलमठ आणि कणकवली ही गावे जवळ असल्याने यापूर्वी एका गावातील बिघाडाचा परिणाम दुसऱ्या गावावरही होत होता. आता कलमठसाठी स्वतंत्र फिडर उपलब्ध झाल्याने या समस्या कमी होतील, असा विश्वास महावितरणचे उपअभियंता संतोष पालवे यांनी व्यक्त केला.
यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे, उपअभियंता संतोष पालवे, शिक्षण अधिकारी रोशन तिरपुडे, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरु वरदेकर, सरपंच संदीप मेस्त्री, ज्येष्ठ नागरिक सुनील नाडकर्णी, उपसरपंच पप्पू यादव, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, माजी उपसरपंच दिनेश गोठणकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, सचिन कोचरे, अनुप वारा, गणेश शिर्के, सुशांत राऊत, परेश आचरेकर, कृष्णा कांबळे, सचिन वाघेश्री, जितू कांबळे, लाईनमन दर्शन सामंत, राहुल काळेगावकर, कार्तिक पिळणकर आदी उपस्थित होते.
कलमठ गावासाठी स्वतंत्र फिडरची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याबद्दल सरपंच संदीप मेस्त्री यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले. गतवर्षी निवेदन देऊन स्वतंत्र फिडरची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी या मागणीचा पाठपुरावा करून फिडर मंजूर करून घेतला. तसेच भूमिगत वीजवाहिनीच्या कामासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून मागण्यात आलेली नुकसानभरपाईची रक्कम कमी करण्यासाठीही सहकार्य करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे कलमठ गावाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून, यामुळे गावातील वीजपुरवठ्याच्या समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले.
