चित्रकार विनायक गोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांमधील कला फुलू लागेल…

बी. जी. गिरकर:चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न..

⚡मालवण ता.०४-: विनायक गोडकर यांनी चित्रकला ही कला जोपासण्यासाठी घेतलेला ध्यास कौतुकास्पद आहे. मालवणातील मुलांना चित्रप्रेमी बनविण्याचे त्यांचे ध्येय असून मालवणात गोडकर्स आर्ट अकॅडमी सुरु करून हे ध्येय पूर्ण करण्याची सुरुवात गोडकर यांनी केली आहे. विनायक गोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांमधील कला फुलू लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कलाशिक्षक बी. जी. गिरकर यांनी येथे बोलताना केले.

गोडकर्स आर्ट अकॅडमी मालवण यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण मालवण येथील दैवज्ञ भवन येथे संपन्न झाले. यानिमित्त प्रसिद्ध चित्रकार विनायक गोडकर यांच्या व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले असून ते ५ मे पर्यंत खुले राहणार आहे. या चित्र प्रदर्शनाचे उदघाटन विनायक गोडकर यांच्या एका चित्राचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कलाशिक्षक बी. जी. गिरकर, चित्रकार विनायक गोडकर, टोपीवाला हायस्कुलचे कलाशिक्षक बलराम सामंत आदी उपस्थित होते.

यावेळी विनायक गोडकर यांनी प्रास्ताविक करत आपल्या कला क्षेत्रातील प्रवासाचा आढावा घेत मुलांच्या चित्रकलेचे कौतुक केले. तसेच चित्रकला ही पुस्तकातून शिकायची नसते, ती आपल्या आजूबाजूलाच असते, ती डोळसपणे पाहता आली पाहिजे असे गोडकर यांनी सांगत मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी मालवणात गोडकर्स अकॅडमी सुरु करत असून त्याचे १० मे रोजी उदघाटन होणार असल्याचे सांगितले. यावेळी बलराम सामंत यांनी विनायक गोडकर यांचा परिचय करून दिला.

यावेळी चित्रकला स्पर्धेतील विजेत्या शालेय विद्यार्थ्यांना व खुल्या गटातील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत जास्त संख्येने सहभाग घेतल्याबद्दल गोडकर्स अकॅडमी तर्फे टोपीवाला हायस्कुलचे कलाशिक्षक बलराम सामंत यांच्याकडे चषक प्रदान करून गौरविण्यात आले. सूत्रसंचालन महेश धामापूरकर यांनी केले. यावेळी शरद धुरी, दिनकर (बबन) शेलटकर, समित कोळगे, प्रज्ञा कोळगे, ऋतुजा केळकर, पांडुरंग गोडकर यांच्यासह स्पर्धक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page