मतदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नारायण राणे यांच्याकडून धनशक्तीचा वापर…

हरी खोबरेकर यांची टीका:राणे कुटुंबियांना ठाकरे कुटुंबियांवर टीका करण्यासाठीच भाजपमध्ये घेतले.

⚡मालवण ता.०४-:
केंद्रीयमंत्री पदाच्या कालावधीत नारायण राणे एकही विकासकाम मालवणात करू शकले नाही, हे त्यांचे अपयश आहे. सकाळी उठावे आणि मातोश्रीवर टीका करावी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी हाच राणे आणि त्यांच्या कुटुंबियांचा विकासाचा कार्यक्रम आहे. राणे यांच्याकडून जनतेला विकासाची अपेक्षा होती, मात्र जनतेला उपेक्षित ठेवण्याचे काम राणे यांनी केले. त्यामुळे राणे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असून मतदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचे काम राणे यांच्याकडून सुरु आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी करत जनता सुज्ञ असून ती शिवसेना -इंडिया आघाडीचे उमेदवार खास. विनायक राऊत यांच्याच पाठीशी उभी राहील, व राऊत हेच विजयी होतील, असा विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मालवण येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, आकांक्षा शिरपुटे, नीनाक्षी मेतर, उमेश मांजरेकर, गणेश कुडाळकर, दीपक देसाई, अक्षय भोसले, नरेश हुले, मोहन मराळ, नीलेश कुडाळकर, महेश देसाई, जेम्स फर्नांडिस, संदीप कोयंडे, करण खडपे, सन्मेश परब, बंड्या लुडबे, नितीन वाळके, अक्षय रेवंडकर, हेमंत मोंडकर, चंदू खोबरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, राणे कुटुंबियांना ठाकरे कुटुंबियांवर टीका करण्यासाठीच भाजपमध्ये घेतलेले आहे. ठाकरेंवर टीका केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही. त्यांनी मतदारसंघात एकही विकासकाम आणलेले नाही. त्यामुळे विकासकामांवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे मुद्दाच नसल्याने ठाकरेंवर ते टीका करत आहेत. ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेमुळे निष्ठावंत शिवसैनिक आणि इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण तालुक्यात जोरदार प्रचार सुरू केला असून मागील निवडणुकीपेक्षा किमान पाच हजारांचे वाढीव मताधिक्य विनायक राऊत यांना देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत, असेही खोबरेकर म्हणाले.

मच्छीमारांवर घालण्यात आलेल्या खोट्या केसेस, नाणार आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, आचरा मच्छीमारांवर दाखल झालेली प्रकरणे यातून मच्छीमार आजही अनेक अडचणींचा सामना करत आहेत. त्यावेळी राणे कुटुंबिय हे धनदांडग्यांच्या पाठिशी राहिलेले होते. त्यामुळे मच्छीमार वस्त्यांमध्ये सभा लावण्यासाठी राणे कुटुंबियांना धनशक्तीचा वापर करावा लागत आहे. मतदारसंघात फिरण्यासाठी राणेंना कार्यकर्ते मिळत नसल्याने आपल्यासमवेत असणाऱ्या लोकांना सभागृहात बसून भाषणबाजी करावी, लागत आहे. यावेळी राणेंच्या पराभवाची हॅट्ट्रिक होणार आहे, असेही खोबरेकर म्हणाले.

खोबरेकर म्हणाले, माझ्या मतदार संघातील देवबाग येथे बंधाऱ्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतः भूमिपूजन केले. मात्र दीड वर्षे होऊनही त्या कामाला अद्याप सुरवात नाही. फक्त भुलभुलैय्या करण्याचे काम त्यांनी केले आहे. आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर चिंदर येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र त्या कामाचाही अद्याप पत्ता नाही. त्यामुळे भाजपच्या भूलथापांना आता येथील जनता बळी पडणार नाही. त्यांचा पराभव हा अटळ आहे, असेही ते म्हणाले.

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सिंधुदुर्गातील बंद होत असलेल्या शाळांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. डीएड बेरोजगार उमेदवारांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही. मात्र आता वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे दर्शन त्यांना झाल्याने राणेंचा प्रचार करताना ते दिसत आहेत. यापूर्वी केसरकरे हेच दशहतवादावर भाषण देत होते आणि त्यांनीच जनतेला काय ते स्पष्ट करावे ? असाही टोला खोबरेकर यांनी लगावला.

You cannot copy content of this page