उबाठा शिवसेनेचे दुकान कायमचे बंद करा…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन ः असलदे येथे निर्धार सभा..

⚡कणकवली ता.०१-: कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला उद्धव ठाकरे व विनायक राऊत यांचा विरोध असतो. जैतापूर व नाणार प्रकल्प झाला असता, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळाला असता. मात्र, ठाकरे व राऊत यांनी या प्रकल्पांना विरोध केला. जैतापूरचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून ठाकरे यांनी काही उद्योजकांकडून कोट्यवधी रुपये घेत विरोध केला. मागील 10 वर्षांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात खा. राऊत यांनी एकही प्रकल्प आणला नाही. कोकणच्या विकासाला विरोध करणाऱ्या उबाठा शिवसेनेचे दुकान कायमचे बंद करा, असे आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले.


महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कासार्डे जि. प. विभाग भाजपतर्फे असलदे येथील गौरी मंगल कार्यालयात निर्धार सभा आयोजित केली होती. याप्रसंगी श्री. राणे बोलत होते. यावेळी यावेळी आमदार नीतेश राणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, माजी जि. प. सदस्य संजय देसाई, भाजपचे सरचिटणीस पंढरी वायंगणकर, सुरेश सावंत, माजी उपसभापती प्रकाश पारकर, भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, उपतालुकाध्यक्ष पूजा जाधव, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, नांदगावचे सरपंच भाई मोरजकर, ओटवचे सरपंच रुहिता तांबे, कासार्डेच्या सरपंच निशा नकाशे, दारूमच्या सरपंच तेजस्वी लिंगायत, तोंडवली-बावशीचे सरपंच मनाली गुरव, असलदेचे सरपंच चंद्रकांत डामरे, कोळोशीचे सरपंच गुरूनाथ आचरेकर आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, सिंधुदुर्गातील जनतेने मला 6 वेळा विधानसभेत निवडून दिले म्हणून मी मुख्यमंत्री झालो. मी पहिल्यांदा आमदार होण्याआधी सिंधुदुर्गात रस्ते, पाणी, वीजेची अपुरी सुविधा होती. मी आमदार झाल्यानंतर या सुविधा उपलब्ध करून दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आज दरडोई उत्पन्न 2 लाखांच्यावर आहे. जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज सुरु केले. जिल्ह्याच्या विकासासाठी राणे कुटुंब सदैव झटत आहे.
विनायक राऊत यांनी 10 वर्षे खासदारकी काळात एकही विकासकाम केले नाही. उद्या खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मी केंद्रात मंत्री असणार आहे. कोकणाच विकास भाजपच्या माध्यमातून होणार आहे. जिल्ह्यात उद्योजक घडवण्यासाठी युवकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी 200 कोटींचे टेक्निकल ट्रेनिंग सेंटर ओरोसमध्ये उभारत आहे. दोडामार्ग, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या तालुक्यांमध्ये कारखाने आणणार आहे. हॉस्पिटलमध्ये लागणार्‍या उपकरणांचे कारखाने दोडामार्गाला उभारणार आहे. जिल्ह्यात फळप्रक्रिया उद्योग आणणार आहोत, असे राणेंनी सांगितले.
चिपी विमानतळाला विरोध करायला विनायक राऊत आघाडीवर होता. मात्र, जेव्हा चिपी विमानतळ पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन करताना स्वागताला विनायक राऊत होता. याची थोडीतरी लाज राऊतांनी बाळगावी. सी वर्ल्डला विरोध विनायक राऊत यांनी केला. त्यामुळे हा प्रकल्प होऊ शकल नाही. विजयदुर्गला 4 हजार कोटींचे आधुनिक बंदर होत असताना त्यालाही राऊतांनी विरोध केला. 3 लाख कोटी गुंतवणूक असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प सुद्धा नको म्हणत राऊतांने विरोध केला, असा आरोप राणेंनी केला.
भाजपा संविधान बदल करणार असा खोटा प्रचार केला जातोय. काँग्रेस राजवटीत 80 वेळा राज्य घटनेत बदल केला. अब की बार मोदी तडीपार म्हणणा्रया उद्धव ठाकरेंचा राणेंनी समाचार घेताना तू केवढा आहेस? तुझे खासदार 5? मोदींचे नाव घेताना लाज वाटत नाही ? उद्धव ठाकरे हा अविचारी बोलतो. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी करून सीएमपद मिळवले. कोविड काळात औषधांच्या टेंडरमध्ये 15 टक्के कमिशन खाण्याचे काम उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी केले. या सगळ्याची चौकशी सुरू असून लवकरच हे दोघेही गजाआड असतील, असा दावा राणेंनी केला.
नीतेश राणे म्हणाले, कासार्डे जि. प. मतदार संघातील जनतेशी राणे कुटुंबीयांचे जिव्हाळाचे नाते आहे. हा मतदारसंघ आमच्या हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातून 90 टक्के मतदान कमळ निशाणीला होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. विकासाला प्राधान्य देत मी काम करत आहे. विकासनिधी देताना आम्ही कमी पडत नाही, मग मते मागताना आम्ही हक्काने मागणार आहे. नांदगाव ग्रा. पं. निवडणुकीत राणेंच्या विचारांचे 11 पैकी 9 सदस्य निवडून आणले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे खासदार बनतील तेव्हा दोन्ही जिल्ह्यातील सगळे प्रश्‍न चुटकीसरशी संपतील. केवळ खासदार नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे साहेब हे कॅबिनेट मंत्री असतील. विरोधकांनी राणे कुटुंबीयांवर कितीही टीका केला तर जनता व राणे यांच्या दरी पडणार नाही, असे राणे म्हणाले. कासार्डे विभाग भाजपतर्फे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष कानडे, संजय देसाई, हर्षदा वाळके, सुरेश सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. असलदे ग्रा. पं. सदस्या सुहासिनी दळवी यांनी राणेंच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. असलदे ग्रामस्थांच्यावतीने सरपंच चंद्रकांत डामरे व सोसासटीचे चेअरमन भगवान लोके यांनी राणेंचा सत्कार केला. या सभेला मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page