नीतेश राणेंची टीका:देशहितासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा दिला तर पोटशूळ उठला..
⚡कणकवली ता.११-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देणे म्हणजे हिंदुत्व भक्कम करणे आहे. यासाठी मी राज ठाकरे यांचे अभिनंदन करतो. राज ठाकरे यांच्या पाठिंब्यानंतर कलानगरमध्ये काल बरनॉलचा तुटवडा पडला असणार, अशी टीका भाजपा प्रवक्ते तथा आमदार नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांशी घरोबा करून हिंदुत्वाचा गेम गेम केला, असा अारोप श्री. राणे यांनी केला. कणकवलीत प्रहार भवन येथे श्री. राणे पत्रकारांशी बोलत होते.
2019 मध्ये स्वतःचे 18 खासदार निवडून आणण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला तेव्हा चालले. मात्र, जेव्हा देशहितासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा दिला तर पोटशूळ उठला. राज ठाकरेंचा मनसे पक्ष नमो पक्ष झाला म्हणणाऱ्या मातोश्रीचा नोकर संजय राऊत यांनी आता उबाठा पक्ष सिल्व्हर ओकवादी झाला असे म्हणावे काय ? मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचा आधार घेत शेम शेम म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांशी घरोबा करून हिंदुत्वाचा गेम गेम केला असे म्हणायचे काय ? असा प्रतिसवाल नीतेश राणे यांनी केला.
