मालवण तालुका ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध…

अध्यक्षपदी सुभाष तळवडेकर व उपाध्यक्षपदी बाबाजी मेस्त्री यांची फेरनिवड..

⚡मालवण ता.०७-: मालवण तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. यात विद्यमान अध्यक्ष सुभाष तळवडेकर (गोठणे) यांच्यासह दहा सदस्य बिनविरोध निवडून आले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून सुभाष तळवडेकर व उपाध्यक्ष म्हणून बाबाजी सखाराम मेस्त्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली. २००२ पासून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून तळवडेकर व मेस्त्री हे कार्यरत आहेत.

बिनविरोध संचालकांमध्ये प्रमोद दिनकर कदम (मठबुद्रुक), बाबाजी सखाराम मेस्त्री (आंबेरी), रमेश नारायण मेस्त्री (राठीवडे), समीर सुदाम म्हाडगूत (मालवण), नरहरी शशिकांत परुळेकर (रामगड), अंकुश राजाराम वडवलकर (कुंभारमाठ), सुधाकर शांताराम माणगावकर (मालवण), विनिता विजय गावडे (चौके), सुप्रिया संदीप तावडे (मालवण) यांचा समावेश आहे.

सन २००२ पासून सुभाष तळवडेकर हे मालवण तालुका ग्रामोद्योग संघांचे अध्यक्ष म्हणून आणि उपाध्यक्ष म्हणून बाबाजी मेस्त्री हे कार्यरत आहेत. २०२९ पर्यंत त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. सलग २० वर्षे एखाद्या संस्थेवर पदाधिकारी म्हणून कार्यरत राहण्याचा विक्रम या दोघांच्या नावावर नोंदला गेला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. सहाय्यक सहकारी अधिकारी विकास मोरे उपस्थित होते. त्यांना संस्थेचे सचिव रमेश परब यांनी सहाय्य केले.

राज्यात ३२२ खादी ग्रामोद्योग संस्था आहेत. यात मालवणच्या संस्थेचे कार्य दर्जेदार व वाखाणण्याजोगे आहे. २०१० मध्ये उत्कृष्ट संस्था अध्यक्ष म्हणून सुभाष तळवडेकर यांचा तत्कालीन शिक्षणमंत्री आणि खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते सत्कार झाला होता. मालवणात २४७७ सभासद असून कर्ज वाटप व कर्ज वसुलीमध्ये दर्जेदोर काम असल्याने संस्थेचा अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे.

You cannot copy content of this page