संतोष परब यांचा इशारा:पुरस्कार प्राप्त वेंगुर्ले नगरपरिषद अत्यावश्यक सेवेकडे दुर्लक्ष..
⚡वेंगुर्ले ता.०५-: वेंगुर्ले नगरपरिषदेचा अग्निशमन बंब गेले बरेच दिवस नादुरुस्त असून गॅरेज मध्ये उभा आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणारा हा बंब सुस्थितीत करून आणण्यात नगरपरिषद प्रशासन चालढकलपणा करत आहे. हा अग्नीशमन बंब येत्या दोन दिवसात दुरुस्त करून सेवेत हजर न केल्यास वेंगुर्ले शिवसेना युवासेने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवाशहर प्रमुख संतोष परब यांनी दिला आहे.
स्वच्छतेसह विविध कामांमध्ये पुरस्कार प्राप्त वेंगुर्ले नगरपरिषद अत्यावश्यक सेवेकडे दुर्लक्ष करत आहे, हे संताप जनक आहे. हा अग्निशमन बंब सुस्थितीत असता तर काल उभादांडा येथील हॉटेल गोलवण मधील लागलेली आग आटोक्यात आणून नुकसान टाळता आले असते. मात्र बंब नादुरुस्त असल्याने सावंतवाडी नगरपालिकेच्या बंबाची वाट पहावी लागली. त्यामुळे या हॉटेलचे नुकसान झाले.
वेंगुर्ले शहरात अशी दुर्घटना घडली असती तर वेंगुर्ले नगरपरिषद प्रशासनाने काय केले असते याचे उत्तर प्रशासनाने नागरिकांना द्यावे. बंब दुरुस्तीच्या शुल्लक खर्च करण्याकडे का लक्ष दिले जात नाही याचीही माहिती मुख्याधिकारी यांनी नागरिकांना दिली पाहिजे.
येत्या दोन दिवसात कोणतीही सबब न सांगता अग्निशमन बंब सेवेत हजर न झाल्यास शिवसेना वेंगुर्ले शहर युवा सेने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा शहर प्रमुख संतोष परब यांनी दिला आहे.
