विठू महाकाली देवीचा पालखी सोहळा २६ मार्च ते ३० मार्च पर्यंत..

⚡वैभववाडी ता.२३-: राजापूर ( रत्नागिरी ) मिळंद येथील  सुमारे २०० वर्षाची परंपरा असलेली रावराणे समाजाची अराध्य देवता विठू महाकाली देवीचा पालखी सोहळा दिनांक २६ मार्च ते ३० मार्च असा पाच दिवस तालुक्यातील रावराणे समाजाच्या बारा इनाम गावात संपन्न होणार आहे. तब्बल बारा वर्षानंतर देवीच्या पालखीचे आगमन होत असून  या सोहळ्यात रावराणे समाजासह गावागावातील अबालवृध्द चाकरमानी, माहेरवाशींनी, पाहुणे मंडळी सहभागी होणार आहे. त्यामुळे ऐन शिमग्यामध्ये या गावात दिवाळी सारखा उत्सव साजरा होणार आहे. देवीच्या  स्वागताची जय्यत तयारी सुरु झाली आहे.यावेळी पालखीचे राजेशाही थाटात स्वागत होणार आहे.
    या अगोदर देवीची पालखी तीन वर्षांनंतर  नावाळे, सांगुळवाडी, एडगाव , सोनाळी या चार गावात येण्याची परंपरा होती. मधल्या काळात बेचाळीस वर्षे ही परंपरा बंद होती. ती सन २०१२ साली रावराणे व आयरे समाजाच्यावतीने बेचाळीस वर्षानंतर पुन्हा ही परंपरा सुरु करण्यात आली. त्यानंतर हा पालखी सोहळा तब्बल एका तपानंतर होत आहे. यावर्षी पासून रावराणे समाज असलेल्या अरुळे, सडुरे, आचिर्णे, लोरे नं.२ , वाभवे या गावात देवीच्या पालखीचे आगमन होणार आहे.
     दिनांक २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मिळंद ता.राजापूर येथून देवीची पालखी लवाजम्यासह सजविलेल्या वाहानातुन निघणार आहे. या पालखीचे आगमन सोनाळी येथे  सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी सोनाली ग्रामस्थ व रावराणे समाजाच्यावतीने पालखीचे मोठ्या जल्लोषात, राजेशाही थाटात स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर एडगाव, सांगुळवाडी, या गावात प्रथेप्रमाणे भेट देत पालखीचे नावळे येथे रावराणे समाजाचे मूळ घराणे भैरी भवानी येथे  आगमन होणार आहे. याठिकाणी पूजा आर्चा , महाप्रसाद होणार असून देवीची ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडतील तर त्यादिवशीचा देवीचा मुक्काम हा नावळे येथेच होणार आहे.
    तर दिनांक २७ मार्च रोजी नावळे येथील रावराणे समाजाच्या पूर्व परंपरे प्रमाणे  प्रमुख घराण्यांना भेट देऊन पालखीचे सांगुळवाडीकडे प्रस्थान होईल.
      तर सांगुळवाडी येथेही पूर्व परंपरे प्रमाणे सांगुळवाडी व निमअरुळे बोर्चादेवी होळीचा मांड येथे देवीची पालखी भेट देणार आहे.तर सांगुळवाडी येथे राञीचा मुक्काम होणार आहे . तर दिनांक २८ मार्च रोजी एडगांव येथे रुढी परंपरे प्रमाणे रावराणे समाजाच्या भैरी भवानी मंदिरास भेट देऊन एडगांव येथे मुक्काम होणार आहे.
    त्याचप्रमाणे दिनांक २९ रोजी सोनाळी होळीचा मांड व पूर्व परंपरे प्रमाणे भेट देणार आहे.
   त्यानंतर यावर्षी पासून प्रथमच अरुळे, सडुरे,लारे, आचिर्णे या गावांतुन पालखीचे आगमन होणार असून आचिर्णे येथे मुक्काम होणार असून दिनांक ३० मार्च रोजी वाभवे होळीचा मांड येथे भेट देऊन पालखीचे मिळंदकडे प्रस्थान होईल.
    या पालखी सोहळ्याची जोरदार तयारी सुरु असून चाकरमानी, माहेरवाशिंनी या पालखी सोहळ्यासाठी गावाकडे दाखल होत असून रावराणे समाजासह संपूर्ण गावांमध्ये उत्साही वातावरण आहे. तर हा पालखी सोहळा पहाण्यासाठी तालुकावासिय आतुर झाले आहेत.

You cannot copy content of this page