Headlines

चाकू-कोयत्याने हल्ल्याप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता…

सबळ पुराव्याअभावी ओरोस अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल..

⚡ओरोस, ता. १-: संगनमत करून चाकू व कोयत्याने हल्ला करून दुखापत केल्याचा तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात आरोपी साजिद कादर फकीर, सौरभ प्रदीप कडुलकर आणि विशाल विजय मोडक यांची सिंधुदुर्ग येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती स्वाती ज. पाटील यांनी हा निकाल दिला.
सरकारी पक्षाच्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर २०१८ रोजी फिर्यादी राहत असलेल्या भाड्याच्या घरात राहुल प्रकाश डांगी हा पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आला होता. त्यावेळी फिर्यादीने वादात पडण्यास नकार देत त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या पत्नीने सागर बांदेकर यांना फोन करून राहुल डांगी हा घरात येऊन वाद घालत असल्याची माहिती दिली. त्यानंतर राहुल डांगी तेथून निघून गेला.
त्याच दिवशी सायंकाळी राहुल डांगी हा आपल्या तीन मित्रांसह पुन्हा फिर्यादीच्या घराबाहेर आला. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. राहुल डांगी याने फिर्यादीचा हात पकडून त्याला मारहाण करण्यास साथीदारांना सांगितल्याचा आरोप होता. त्यानंतर विशाल विजय मोडक याने फिर्यादीला मागून पकडले, सौरभ प्रदीप कडुलकर याने चाकूने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला, तर साजिद कादर फकीर याने कोयत्याच्या मागील बाजूने फिर्यादीच्या मांडीवर व डाव्या हातावर मारून दुखापत केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले होते.
या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ५०४ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची सुनावणी सिंधुदुर्ग येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या जबानीत विसंगती आढळून आल्याने फिर्यादीचा आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने आरोपी साजिद कादर फकीर, सौरभ प्रदीप कडुलकर आणि विशाल विजय मोडक यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ राहुल डांगी यांचे निधन झाले असून, आरोपींच्या वतीने ॲड. राहुल द. मडगांवकर यांनी कामकाज पाहिले.

You cannot copy content of this page