Headlines

आंबोली मान्सून मॅरेथॉनला मिळणार आंतरराष्ट्रीय ओळख…

विशाल परब यांचे अभिवचन:सलग तिसऱ्या वर्षी शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग..

⚡आंबोली, ता.०२-: सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत आयोजित करण्यात आलेल्या आंबोली मान्सून मॅरेथॉनला यंदा महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातील शेकडो धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सलग तिसऱ्या वर्षी झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याची घोषणा केली.

सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम, आंबोली-सांगेली, सायकलिंग असोसिएशन यांच्या आयोजनातून आणि विशाल सेवा फाउंडेशनच्या प्रायोजकत्वातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, सामाजिक कार्यकर्त्या वेदिकाताई परब, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, सदस्य प्रथमेश सावंत, आंबोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासक सावित्री पालेकर, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दिनेश गावडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “आंबोलीची ओळख केवळ पर्यटनस्थळापुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्सून मॅरेथॉन आयोजित करणारे क्रीडा पर्यटनस्थळ म्हणून निर्माण झाली पाहिजे. कोकणातील गुणवंत धावपटूंना मोठे व्यासपीठ मिळावे आणि येथील प्रतिभेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.”
यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्राबरोबरच गोवा आणि कर्नाटकातील धावपटूंनी सहभाग घेतला. पावसाच्या सरी, दाट धुके आणि हिरवाईने नटलेल्या घाटरस्त्यावर धावण्याचा अनोखा अनुभव स्पर्धकांनी घेतला. विविध अंतरांच्या गटांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये सहभागी धावपटूंनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी धावपटूंची नोंदणी, सुरक्षितता, रेस्क्यू व्यवस्था, मार्गदर्शन, वैद्यकीय सुविधा तसेच स्वयंसेवकांचे नियोजन काटेकोरपणे करण्यात आले होते. आयोजकांच्या नियोजनाचे स्पर्धकांनीही कौतुक केले.
सामाजिक कार्यकर्त्या वेदिकाताई परब यांनी महिलांच्या वाढत्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त करत महिलांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यासाठी अशा स्पर्धा प्रेरणादायी असल्याचे सांगितले. महिलांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली असून क्रीडा क्षेत्रातही त्यांचा सहभाग वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील धावपटूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कोकणातील क्रीडा संस्कृतीला चालना देणे आणि आंबोलीला क्रीडा पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित करणे हा या उपक्रमाचा व्यापक हेतू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
यंदाच्या स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता पुढील वर्षी स्पर्धेचा अधिक व्यापक स्तरावर विस्तार करून आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page