सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि. मा. का.) : मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना जिल्हा स्तरीय समितीची बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन राऊत यांच्यासह जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख, कार्यकारी अभियंता PMGSY, जिल्हा नियोजन अधिकारी, कार्यकारी अभियंता सा.बां. जि.प. सिंधुदुर्ग व समितीतील इतर सदस्य उपस्थित होते.
शेतकऱ्यांना बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतमाल सुलभपणे बाजारात पोहोचवण्यासाठी शासनाच्या 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने अंतर्गत तालुक्यातील विविध गावांमधील पाणंद रस्त्यांची कामे वेगाने हाती घेण्यात येणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश गाव नकाशावरील जुने शेतरस्ते व पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून ते पक्के व बारमाही वापरा योग्य बनवणे हा आहे. या रस्त्यांमुळे पावसाळ्यात चिखलामुळे होणारी शेतकऱ्यांची अडचण दूर होणार असून, ट्रॅक्टर व मालवाहतूक वाहने थेट शेतापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना अंतर्गत शासन निर्देशानुसार अर्थमुव्हर उत्खनन यंत्रसामुग्रीचे (यंत्रसामुग्री+इंधन+मनुष्यबळ) प्रति तासिका दर निविदाद्वारे दरपत्रक मागविण्याकरिता निविदा प्रारूप प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयामार्फत करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. त्यास अनुसरून मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजना २०२५-२६ अंतर्गत कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांनी सादर केलेल्या दरास जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने मंजुरी दिली.
00000
