सामाजिक वनीकरणच्या वृक्ष लागवडीची चौकशी करा…

मनसेच्या सचिन तावडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

ओरोस ता २१
शासनाची ३३ कोटी वृक्ष लागवड तसेच अन्य वृक्ष लागवड उपक्रम अंतर्गत जिल्ह्यात खोट्या नोंदी दाखवून शासनाचे लाखो रुपये सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लुटले आहेत. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन देत केली आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चंदन मेस्त्री, वैभववाडी तालुकाध्यक्ष महेश कदम, कणकवली शहाराध्यक्ष योगेश कदम, देवगड किंजवडे विभाग अध्यक्ष परेश आडकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी तावडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात, महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड ते अन्य वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उद्दिष्ट जिल्ह्याने घेतले आहे. यात रोप वाटिका निर्माण करून रोपे तयार करणे अशा कामांचा समावेश आहे. त्यासाठी शासनाने कोट्यानी रुपये निधी जिल्ह्याला दिला आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील अधिकाऱ्यांनी मात्र खोट्या नोंदी करून यातील लाखो रुपये लंपास केले आहेत. लाखो रुपयांची कामे आपल्या नातेवाईकांना दिल्याचे कागदोपत्री दिसत आहे. तसेच या कामात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसताना त्यांच्या खात्यात लाखो रुपये टाकण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी ही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून लाटण्यात आली आहे. याशिवाय रोपवाटिका तयार करताना वस्तू खरेदी पासून लागवडी पर्यंत खोट्या नोंदी दाखविण्यात आल्या आहेत.
रेल्वेच्या दुतर्फा वृक्ष लागवड केल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, ही जागा कोकण रेल्वे प्रशासनाची आहे. यासाठी १० ते ६० मीटर जागा आहे. त्याच जागेत ५ जून रोजी कोकण रेल्वे प्रशासनाच्यावतीने वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन साजरा केला जातो. तरीही त्याच जागेवर हे दोन्ही विभाग वृक्ष लागवड उपक्रम कसा राबवितात ? हा प्रश्नच आहे. या भ्रष्टाचारात कोकण रेल्वेचे अधिकारी सुद्धा समाविष्ट आहेत. याबत रेल्वे प्रशासनाला विचारले असता लावलेली झाडे तोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाकडून शासनाच्या डोळ्यात धूळफेक सुरू आहे. याबाबत सखोल चौकशी व्हावी, असे नमूद करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page