माजी आम. प्रमोद जठार:जो उमेदवार दिला जाईल त्याला भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत…
⚡वेंगुर्ले ता.१९-: उबाठा चे खासदार विनायक राऊत हे मतदार संघात विकासासाठी निधी आणायला कमी पडले.रोजगार निर्मिती साठी त्यांच्या कडून काहीच झाले नाही. उलट आणलेल्या प्रकल्पांना विरोधाची त्यांची भूमिका कायम राहिली. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात महायुती तर्फे वरिष्ठ जो उमेदवार देतील तो निवडून येईल आणि पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या कामात साथ देणाराच असेल असा विश्वास भाजपा लोकसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केला.
वेंगुर्ले येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री जठार बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शरद चव्हाण, बाळू देसाई, सुहास गवंडळकर, दिलीप गिरप, प्रणव वायंगणकर, साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, दादा केळुसकर, वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, रवी शिरसाठ, सोमनाथ टोमके, अभी वेंगुर्लेकर, प्रसाद पाटकर, सारिका काळसेकर, वृंदा गवंडळकर, सौ. परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. जठार पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पार्टी लोकशाहीच्या राष्ट्रीय महोत्सवाच्या स्वागताची सिद्धता करत आहे. भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा लोकोत्तर व्हावा यासाठी जाहीरनाम्यात मतदारांच्या सुचनांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न पक्षनेतृत्त्वाने केला आहे. याच अनुषंगाने लोकसभा प्रवास अंतर्गत वेंगुर्ले येथे भेटीगाठींचा कार्यक्रम चालू आहे.
सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी मोदी सरकारमध्ये 400 पेक्षा जास्त खासदार असणार आहेत त्यामुळे देशाच्या विकासाला अजून गती प्राप्त होणार आहे.
आमच्या मतदारसंघाचा उमेदवार वरिष्ठ नेते दोन दिवसात जाहीर करतील. जो उमेदवार दिला जाईल त्याला भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
पाच वर्षांपूर्वी निवडणुकीच्या वेळी आम्ही जाहीरनाम्यामध्ये जे जे सांगितले होते, ते पूर्ण केले आहे. कश्मीरी हिंदूंचा प्रश्न, राम मंदिर, मुंबई गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर, गरिबांना अंत्योदय योजनेमधून सक्षम करण्याचा प्रयत्न.अशा विविध प्रकारे भाजपाने काम केले आहे. यापुढे रोजगाराचा प्रमुख विषय आमच्या जाहीरनाम्यामध्ये असणार आहे. या भागात शिक्षण घेतलेल्या युवकांना येथेच रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे असेही त्यांनी सांगितले.
