शर्थीच्या प्रयत्नांनी बागेला लागलेली आग आणली नियंत्रणात..
दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे काजू कलम बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचविण्यात यश आले.अग्निशमन बंबाच्या मदतीने भर दुपारी लागलेल्या आगीवर कर्मचाऱ्यांनि वेळीच नियंत्रण मिळविले आणि नुकसानिच्या भितीने कासावीस झालेल्या शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
याबाबत अधिक माहिती अशी , शहरातील प्रभाकर बोर्डेकर व आनंद म्हावळणकर यांची दोडामार्ग – भेडशी रस्त्याला लागून काजू बागायती आहे.जवळपास पाचशेहून अधिक काजूकलमांची लागवड या दोन्ही शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीत केली आहे.याच काजू बागायतीला सोमवारी दुपारी अचानक आग लागली.याबाबत श्री.म्हावळणकर यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष समीर रेडकर याना माहिती दिली.लागलीच त्यांनी नगरपंचायतीला कळविले व स्वतः आग विझविण्यासाठी घटनास्थळी गेले. आग लागल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी वेळ न दवडता अग्निशमन बंब घेऊन घटनास्थळी दाखल होत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही मिळाले.कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. आणि काजूची बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली.या मदत कार्यात रुत्वेश म्हाडगूत , सूर्यकांत गवस , अंकुश कदम ,स्वप्नील सावंत ,प्रथमेश चव्हाण आदींनी सहभाग घेतला.
