जिल्हा परिषदेत सभेत समाज कल्याण अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांची नाराजी…

पदभार काढून घेण्याचा निर्णय:चौकशी होणार:५ टक्के दिव्यांग निधी प्रकरण भिसेंना भोवणार

सिंधूदुर्गनगरी ता २२ समाज कल्याण समिती, स्थायी समितीसह जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचा ठराव डावलून प्रभारी समाज कल्याण अधिकारी मदन भीसे यानी ५ टक्के दिव्यांग निधी खर्चाची कामे मंजूर करीत त्याचा निधी वितरित केला. त्यामुळे भीसे यानी नियमबाह्य मंजूर केलेल्या कामाना स्थगिती देत त्यांच्याकडील पदभार तात्काळ काढून घेण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या जिल्हा परिषद सभेत सत्ताधारी भाजपने घेतला. तसेच भीसे यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा सभाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी मंजूर केली. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी दुपारी संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजित नायर, सभा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटनेते रणजीत देसाई, विरोधी गटनेते नागेंद्र परब, संतोष साटविलकर, अंकुश जाधव, रेश्मा सावंत, संजना सावंत, सरोज परब, अमरसेन सावंत, प्रदीप नारकर यांच्यासह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. यावेळी आ नितेश राणे यानी पाच रुग्णवाहिका दिल्याने, पालकमंत्री उदय सामंत यानी ११ रुग्ण वाहिका मंजूर केल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच कुडाळ, मालवण पंचायत समिती, जिल्हा परिषद व कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठराव यशवंत पंचायतराज मध्ये यश मिळविल्याने घेण्यात आला.

You cannot copy content of this page