सावंतवाडी मतदारसंघातील धान्य कोठारांची तात्काळ तपासणी करा…

नवोदय विद्यालय विद्यार्थी विषबाधा पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा ची मागणी:जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी प्रांताधिकारी यांना दिले निवेदन

⚡बांदा ता.१४-: सांगेली येथील नवोदय विद्यालयात मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने या पार्श्वभूमीवर सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील पोषण आहार पुरविणाऱ्या सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील धान्य कोठाराची तात्काळ तपासणी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी केली आहे. यासंदर्भात प्रांतधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे श्री खतीब यांनी सांगितले.


श्री खतीब म्हणाले की, सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०० हून अधिक विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मुलांच्या भवितव्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याने या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये मुलांना दुपारच्या आहारात पोषण आहार वितरित करण्यात येतो. दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये हा पोषण आहार प्रत्येकी दोन महिन्यांचा एकत्रित देण्यात येतो. अनेक शाळांच्या इमारती या जुन्या व जीर्ण झाल्या असल्याने तसेच धान्य कोठार नसल्याने हा पोषण आहार सुरक्षित ठेवणे अडचणीचे ठरत आहे. यामुळे उंदीर, पाली तसेच कीटक यांचा पोषण आहार साहित्यात मुक्त संचार सुरु असतो. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने तसेच सांगेली सारखी घटना टाळण्यासाठी तिन्ही तालुक्यातील शाळांच्या धान्य कोठारांची तपासणी करावी तसेच काही त्रुटी आढळल्यास तात्काळ संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन समिती यांना सूचना द्याव्यात अशी मागणी आपण करणार असल्याचे सांगितले. लवकरच याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page