तळगाव येथील वीज वितरणचे जीर्ण पोल चोरीस…

ग्रामस्थांनी वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष:गुन्हा दाखल करण्याची केली मागणी..

⚡मालवण ता.१२-: मालवण तालुक्यातील तळगाव पेडवेवाडी खांदवाडी येथे वीज महावितरण कंपनीने जुने वीज पोल बदलून त्याठिकाणी नवीन पोल बसविल्यानंतर तेथेच काढून ठेवण्यात आलेले जुने लोखंडी वीज पोल एका व्यक्तीने आपल्या खासगी वापरासाठी चोरून नेल्याचे समजताच तळगावातील काही ग्रामस्थांनी वीज महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री. म्हात्रे यांच्याकडे तक्रार करत सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

यासंबंधीचे अधिक वृत्त असे की, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. म्हात्रे हे मालवण येथील वीज कार्यालयात आले असता तळगाव येथील ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन तळगाव मधील वीज पोल चोरीबाबत लक्ष वेधले. यावेळी वीज कंपनीचे कट्टा येथील सहायक अभियंता श्री. शिंदे, मालवणचे सहाय्यक वीज अभियंता मालवण गुरूदास भुजबळ आदी उपस्थित होते.

वीज महावितरणच्या वतीने तळगाव पेडवेवाडी येथील जुने जीर्ण झालेले पोल बदलून नवीन पोल बसविण्यात आले होते. व जुने जीर्ण झालेले लोखंडी पोल तेथेच काढून ठेवण्यात आले होते. मात्र हे पोल एका व्यक्तीने चोरून आपल्या खासगी कामासाठी वापरल्याची चर्चा आहे हा घडलेला प्रकार तळगाव येथील काही ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी विजवितरण कंपनीला हा घडलेला प्रकार कळवून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी दि. २७ फेब्रुवारी रोजी मालवण येथील वीज उपअभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. विज वितरण कंपनीच्या ही चोरी निदर्शनास आणून देऊन देखील त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याने तळगाव ग्रामस्थांनी काल मालवण येथील वीज वितरण कंपनीला भेट देत तेथे उपस्थित उप कार्यकारी अभियंता श्री. म्हात्रे यांचे लक्ष वेधत जाब विचारला. जीर्ण झालेले लोखंडी पोल चोरीस जाऊन देखील विजवितरण कंपनीला त्याचा पत्ता नाही. ज्या दिवशी तक्रार दिली त्यावेळी वीज कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट न देता दुसऱ्या दिवशी पाहणी केल्याने त्याठिकाणी पोल आढळले नाहीत, ते पोल त्या व्यक्तीने लपवून ठेवले, असा आरोपही ग्रामस्थांनी करत या चोरी प्रकरणी अधिकारी त्या व्यक्तीला पाठीशी घालत असतील तर ते चुकीचे असे सांगितले. या सर्व प्रकाराची चौकशी करून यामध्ये जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करणार असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page