सिंधुदुर्गनगरी ता ११
प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी लक्षवेधी घोषणा देत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गेली अनेक वर्षापासून विविध मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक पत्रव्यवहार केले, मात्र अद्यापही शिक्षकांच्या प्रश्ना बाबत योग्य निर्णय झालेला नाही. यासाठी आज पुन्हा एकदा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग वतीने जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर आज दुपारी ३ वाजल्यापासून लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे, कार्याध्यक्ष मधुसूदन घोडे, कोषाध्यक्ष पूनम पालव, राज्य संयुक्त चिटणीस महादेव देसाई , राज्य संघटक प्रशांत पारकर, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा अंतर्गत बदल्या व नवीन शिक्षण सेवक नियुक्ती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदल्यापूर्वी कार्यमुक्त करावे तसेच त्यांच्या रिक्त झालेल्या जागा जिल्हा अंतर्गत बदली व नवीन नवनियुक्त शिक्षण सेवकांसाठी खुल्या कराव्यात, पदवीधर विषय शिक्षकांची निवड प्राधान्याने कार्यरत उपशिक्षकांमधूनच करावी, विस्तार अधिकारी पदोन्नती व पदवीधर पदावनत प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत व सदरच्या पदोन्नत्या तात्काळ देण्यात याव्यात, मासिक वेतन (पगार) दरमहाच्या १ तारखेला बँक खाते जमा करावे., शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करावे, आदी प्रमुख मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या असून या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.
