जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडले आंदोलन..
सिंधुदुर्गनगरी ता ६
ग्रामपंचायतीने मागितलेली माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. मात्र वैयक्तिक उपोषणातील मागणीनुसार तात्काळ कार्यवाही करावी, यासाठी प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला वेठीस धरले जात आहे. या प्रशासनाच्या कार्यपद्धती विरोधात आज तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत सरपंच सहित ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे.
मालवण तालुक्यातील तारकर्ली -काळेथर ग्रामपंचायतीकडून जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत प्रशासनाकडे अनेक पत्रव्यवहार करून आवश्यक असलेली माहिती मागितली. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत ने मागितलेली माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. मात्र वारंवार उपोषण आंदोलन करून वैयक्तिकरित्या मागितलेल्या माहितीसाठी प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतली जात आहे. वैयक्तिक उपोषणकर्त्याच्या मागणीनुसार तात्काळ कार्यवाहीसाठी प्रशासनाकडून ग्रामपंचायत वेठीस धरले जात आहे. या कार्यपद्धती विरोधात आज तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत सरपंच मृणाली मयेकर, ग्रामपंचायत सदस्य अनघा कुबल, तनवी मेस्त्री, स्नेहाली केळुसकर, प्रेरणा सावंत, तसेच ग्रामस्थ विष्णू मेंस्त्री, गजानन कुबल, भिवाजी कोळबकर ,डॉ रामचंद्र परब, आबा केळुसकर, यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे. या निवेदनातून त्यांनी विविध कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यामध्ये माननीय तहसीलदार मालवण यांच्याकडे कोणती माहिती पुरविण्याचे आदेश दिलेले आहेत त्याबाबतच्या लेखी पत्राची प्रत, ग्रामसेवक ग्रामपंचायत तारकरली -काळेथर यांना ५ मार्च रोजी कोणत्या विकास कामाची अंदाजपत्रके तसेच सीआरझेड कार्यालयाच्या परवानगी सहित सर्व कागदपत्रांच्या नक्कल प्रति देण्याबाबतच्या आदेशाच्या लेखी पत्राची प्रत ,मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामसेवक आणि सरपंच ग्रामपंचायत तारकर्ली -काळेथर यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्यासाठी दिलेल्या आदेश पत्राची प्रत, तसेच थेट लोकनियुक्त सरपंचावर शिस्तभंगाचे प्रयोजन व हेतूची माहिती देण्यात यावी. तारकर्ली एमटीडीसी समुद्रकिनारा रेड झोन मध्ये कधी घोषित करण्यात आला ?त्याच्या शासन निर्णयाची प्रत तसेच स्थानिक प्रशासनास त्याची लेखी माहिती दिल्याच्या पत्रव्यवहाराची प्रत, कोणता परिसर रेड झोन घोषित झाला व का घोषित झाला? घोषित झाला असल्यास त्यानंतर कोणती कार्यवाही करण्यात आली, कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, ज्या ठिकाणी रेड झोन घोषित करण्यात आला त्या ठिकाणच्या पर्यटन संस्थाना त्याबाबत माहिती दिली असल्यास त्या पत्राच्या प्रती देण्यात याव्यात. तारकर्ली एमटीडीसी समुद्रकिनारा हा रेड झोन परिसर असेल तर एमटीडीसी तारकर्लीने पर्यटकांना समुद्रात जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात यावी. त्याबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून कोणती कार्यवाही झाली?त्याची माहिती द्यावी. दिनांक १ जानेवारी २०२३ पासून ते आतापर्यंत ग्रामपंचायतीने केलेल्या पत्रव्यवहारावर प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती देण्यात यावी. आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. तर ग्रामपंचायतीने मागितलेली माहिती प्रशासनाकडून वेळेत दिली जात नाही, मात्र वैयक्तिक स्वरूपात केलेल्या उपोषणाची दखल घेत तात्काळ कार्यवाहीसाठी ग्रामपंचायतीला वेठीस धरण्याच्या प्रशासनाच्या कार्यपद्धती विरोधात आज तारकर्ली ग्रामस्थ एकवटले असून सरपंच मृणाली मयेकर यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
