बांदा प्रभाग क्रमांक पाच मधील ठाकरे सेनेच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. देवल येडवे यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡बांदा ता.०४-: बांदा शहर ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक पाच मधील शिवसेना (ठाकरे गटाच्या) ग्रामपंचायत सदस्या सौ. देवल येडवे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. बांदा ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता असलेल्या भाजपचे संख्याबळ हे आता तेरा झाले आहे. शिवसेना शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांच्या प्रभागातून त्या निवडून आल्याने त्यांच्यासाठी हा धक्का आहे.
बांदा ग्रामपंचायत मध्ये एकूण १५ सदस्यापैकी भाजपचे आता १३ सदस्य झाले आहेत. सरपंच हे भाजपचे आहेत. विरोधात साईप्रसाद काणेकर यांच्यासह एकूण ३ ग्रामपंचायत सदस्य आहेत. काल उशिरा सौ. येडवे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम सावंत यांच्यासह भाजपचे बांद्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपच्या बालेकिल्यात प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेनेचे सदस्य असलेले साईप्रसाद काणेकर यांनी आपले वर्चस्व ठेवले आहे. गेल्या दोन निवडणुकीत त्यांनी येथून स्वतःसह अन्य एक सदस्य निवडून आणला आहे. मात्र सौ. येडवे यांनी भाजप मध्ये जाहीर प्रवेश केल्याने श्री काणेकर यांना धक्का बसला आहे.
चौकट:-
बांदा शहराच्या विकासात हातभार लावण्यासाठीच भाजपात – सौ. देवल येडवे
समाजातील सर्व स्तरातील घटकांना न्याय मिळण्यासाठी ज्या पद्धतीने भाजप मध्ये काम केले जात आहे ते आदर्शवत आहे. त्याच आदर्शने प्रेरित होऊन तसेच मागील एक वर्ष माझ्या विभागातील विकास कामांकरीता मला म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही. परंतु भाजपाच्या स्थानिक नेतृत्व, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी सहकार्य केले गेले. या सर्वांचा विचार करून व शहराचा विकास करायचा असेल तर अशाच विकासाचे ध्येय असलेल्या चांगल्या विचारांच्या माणसांसोबत काम करणे योग्य ठरेल व लोकांचे प्रश्न सोडवु शकेन असा विचार करून मी भाजपात प्रवेश केला असुन यापुढे पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती प्रामाणिकपणे पुर्ण करेन.

You cannot copy content of this page