माजगावला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळणार…

सरपंच अर्चना सावंत यांच्या आंदोलनाला यश:भाजप नेते राजन तेली यांची यशस्वी शिष्टाई

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: सावंतवाडी तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतसाठी पूर्ण वेळ कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळावा. या मागणीसाठी सरपंच अर्चना सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले होते. मात्र, भाजपचे नेते राजन तेली यांनी जिल्हा परिषद प्रशासनासोबत यशस्वी चर्चा केल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी मान्य केली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावी यांची मे २०२३ रोजी आंबोली- गेळे येथे प्रशासकीय बदली झाल्यामुळे ग्रामपंचायतचा अतिरिक्त कार्यभार चराटा ग्रामपंचायत ग्रामसेवकांकडे आठवड्यातील दोन दिवस सोपविण्यात आला. तदनंतर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कामांचा वाढता व्याप असल्यामुळे त्यांनी आपली बदली करून घेतली .त्यामुळे माहे जानेवारी २०२४ रोजी न्हावेली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.मात्र त्यामुळे माजगाव ग्रामपंचायतच्या प्रशासकीय विकास कामांना खीळ बसली असून विद्यमान सरपंचांना ग्रामस्थांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासन चालवणे कठीण झाले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील माजगांव ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असताना वरिष्ठ प्रशासनाकडे मागणी करून सुद्धा कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी अद्याप पर्यंत नेमणूक करण्यात आलेला नाही. त्याचा ग्रामपंचायतीच्या कामकाजावर परिणाम झालेला असून नागरी सुविधा अंतर्गत विविध विकास कामे तसेच पंधराव्या वित्त आयोगातील आराखड्यातील मंजूर असलेली कामे पूर्ण करताना अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यात अडचणी निर्माण होत आहेत. नळ पाणी योजनांच्या समस्यांकडे निधी खर्च घालताना अडचणी येत असून त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. गेले वर्षभर पंधरावा वित्त आयोग निधी केवळ ५ टक्के एवढाच खर्च झालेला असून याला जबाबदार कोण ?हा प्रश्न निर्माण झालेला आहे. यावर तोडगा म्हणून कायमस्वरूपी व पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नेमून देणे आवश्यक आहे. असे असतानाही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने माजगाव सरपंचासह ग्रामस्थांनी आजपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सरपंच अर्चना सावंत, संजय तानसे, माधवी भोगण, विशाखा जाधव, मधु कुंभार, अशोक धुरी, ज्ञानेश्वर सावंत, अजय सावंत, सचिन बिर्जे, रिचर्ड डिमेलो, विक्रम नाईक, अनिकेत सावंत, सुनील सावंत आदी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page