तोंडवळी तळाशील रस्त्याची अक्षरश दुरावस्था झाल्याने ग्रामस्थ आक्रमक…

रास्ता रोको केले आंदोलन: सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. सर्वगोड यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित..

⚡मालवण ता.२६-: तोंडवळी तळाशील रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली असून याबाबत शासन दरबारी वारंवार लक्ष वेधूनही रस्त्याचे काम होत नसल्याने संतप्त बनलेल्या तोंडवळी ग्रामस्थांनी आज आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढत मालवण आचरा रस्त्यावर तोंडावळी फाटा येथे रस्त्यावरच ठाण मांडत रास्ता रोको करत वाहतूक रोखून धरली. तब्बल तासभर सुरू असलेल्या या आंदोलना दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कमलिनी प्रभू यांनी दुपारी आंदोलनस्थळी दाखल होत ग्रामस्थांशी चर्चा केली. चर्चेअंन्ती खराब झालेल्या रस्त्याचे येत्या दोन दिवसात खड्डे बुजवले जातील तसेच चालू असलेल्या बजेटमध्ये रस्त्याच्या निधीला मंजुरी मिळवून घेतली जाईल असे आश्वासन वरिष्ठ अधिकारी श्री. सर्वगोड यांच्या सूचनेनुसार दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन येत्या आठ दिवसासाठी स्थगित केले.

दरम्यान, येत्या आठ दिवसात तोंडवळी रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.

मालवण आचरा रस्त्यावरून तोंडवळी फाटा येथून तोंडवळी गावात जाणाऱ्या रस्त्यावरील खडी पूर्णतः उखडून गेली असून अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ वाहनचालकांना त्रास सहन करत वाहतूक करावी लागत आहे. या रस्त्याच्या डागडुजी तसेच डांबरीकरण व्हावे या मागणीसाठी शासनाकडे ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी लक्ष वेधण्यात आले. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आज ग्रामस्थांनी मालवण आचरा रस्त्यावर तोंडवळी फाटा येथे ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी ग्रामस्थांनी या मार्गावरील वाहतूक रोखून धरली. आंदोलन सुरु होताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. नांदोस्कर तसेच आचरा व मालवण पोलीस दाखल झाले. आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आंदोलन न करण्याची सूचना केली. मात्र ग्रामस्थांनी आंदोलनावर ठाम राहत जोपर्यंत सक्षम अधिकारी जागेवर येऊन रस्त्याच्या कामाबाबत हमी देत नाहीत तोपर्यंत मागे न हटणार नाही अशी भूमिका घेतली. या आंदोलनात तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्या मनस्वी चव्हाण,सुजाता पाटील, अनन्या पाटील, संजय केळुसकर, दीपक कांदळकर, नाना पाटील, ज्ञानेश गोलतकर तसेच शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.

या आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तासाभरात आंदोलनस्थळी दाखल होण्याबाबत सांगण्यात आले, मात्र दोन तास उलटूनही अधिकारी हजर न झाल्याने ग्रामस्थांनी पुन्हा रस्ता रोखून धरला. तासभर ग्रामस्थांनी रस्ता अडवल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बांधकाम विभागाच्या उपअभियंता कमलिनी प्रभू या आंदोलन स्थळी उशिराने दाखल झाल्याने त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रभू यांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावण्यात येईल असे सांगितले. मात्र, संतप्त ग्रामस्थांनी आपण वर्षभरापूर्वी असेच आश्वासन दिले होते, मात्र कोणतेही काम झाले नाही, असे सुनावत त्यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली.

ग्रामस्थ आपल्या आंदोलनावर ठाम राहिल्याने यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांना रस्त्यावरून हटवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक होऊन ग्रामस्थ व पोलीस यांच्यात शब्दिक चकमकी उडाल्या. पोलिसांनी ग्रामस्थांना रस्त्यावरून बाजूला घेत अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात पुन्हा चर्चा घडवून आणली. उपअभियंता कमलिनी प्रभू यांनी ग्रामस्थ आंदोलनावर ठाम असल्याने व दिलेल्या आश्वासनावर समाधानी नसल्याने वरिष्ठ अधिकारी सर्वगोड यांच्याशी संपर्क करत ग्रामस्थांशी त्यांचा संवाद घडवून आणला. यावेळी सर्वगोड यांनी येत्या दोन दिवसात पडलेले खड्डे कार्पेट घालून बुजवले जातील तसेच चालू बजेटमध्ये या रस्त्यासाठी मंजुरी मिळवून घेतली जाईल असे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले.

You cannot copy content of this page