उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांची माहिती
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२०-:* जागतिक जल दिनांचे औचित्य साधुन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात दिनांक 22 मार्च 2021 रोजी जलशपथ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक २२मार्च ते २७ मार्च, २०२१ या कालावधीत जल साक्षरता वाढविण्याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आले आहे. अशी माहिती श्री. विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) यांनी दिली आहे. पाण्याचे महत्त्व आधोरिखीत करुन सर्व काळ उपलब्धतेसाठी लक्ष केंद्रीत करुन सर्वव्यापी उपाय योजना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ व्दारे सन १९९३ पासून दरवर्षी दिनांक 22 मार्च हा जागतिक जल दिन साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने जगातील शुध्द व सुरक्षित पाण्यासाठी जन समुदायामध्ये जागृती निर्माण केली जात आहे. त्यासाठी विविध स्तरावर जलजीवन मिशन अंतर्गत उपक्रमाचे आयोजन दिनांक २२ मार्च ते २७ मार्च, २०२१ या कालावधीत करण्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायत स्तरावर “जुन ते सोन”- जलस्त्रोताचे पुनरुज्जीवन आणी बळकटीकरण स्पर्धा राबविण्यात येणार आहे. पाण्याचे जुने स्रोत, जे वापरात नाहीयेत परंतु त्यांचा वापर होऊ शकतो, अशा स्रोतांचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरण करून त्यांचा वापर करणे, त्यांचे महत्व ग्रामस्था सांगुन त्याचे संवर्धन करणे हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेचे परीक्षण गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी करुन उल्लेखनीय,उत्तम काम करणा-या ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात येणार आहे. या सप्ताह कालावधीत स्त्रोत व साठवण टाकी/ जलकुंभ सफाई सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील पिण्याचे पाणी साठवण टाक्याची साफसफाई करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात शुन्य गळती मोहिम शपथ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणारी पाणी गळती बंद करण्यात येणार आहे. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत लोगो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धांकानी जलजीवन मिशन बाबत तयार केलेला लोगो जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडे पाठवावयाचे आहेत सदर लोगो राज्यस्तरीय स्पर्धेकरीता पाठविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील वाचक, पत्रकार व ग्रामस्थाकरीता जागतिक जलदिन 2021 लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पाण्याचे मूल्य.या संकल्पनेच्या अनुषंगाने ५ उपघटक (शेतीसंदर्भात पाण्याचे मूल्य, उद्योगासाठी पाण्याचे मूल्य, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी पाणी, पाण्याचे सांस्कृतिक मूल्य) इत्यादी विषयांवर प्रकाशित केलेल्या वृत्तपत्राच्या तपशीलासह लेख जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षास पाठविण्यात यावा. सदर लेखाची तपासणी करुन जागतिक “जल दिन २०२१ – लेखसंग्रह” अशी लेखांची एक पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे त्यात प्रकाशित केला जाणार आहे. अशी माहिती श्री विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे.
