ग्रामस्थांनी वेधले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष : अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याचा इशारा..
⚡बांदा ता.०७-: रोणापाल श्री देवी माऊली मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, सार्वजनिक स्वच्छतागृह व्यवस्था करणे, हायमास्ट बसविणे व ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देणे याविषयीच्या प्रस्तावाबाबत रोणापाल ग्रामपंचायत प्रशासन सहकार्य करत नाही. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. रोणापाल ग्रामपंचायत कार्यालय येथे उपोषणास बसणार असल्याचा इशारा माजी सरपंच तथा देवस्थान मानकरी प्रकाश गावडे तसेच ग्रामस्थांनी दिला. यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना (शिंदे) इन्सुली विभागप्रमुख राजन परब, ग्रामपंचायत सदस्य नंदू नेमण, शिवसेना (ठाकरे) शाखाप्रमुख मंगेश गावडे, सामाजिक कार्यकर्ते सुदिन गावडे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाबल तूयेकर, देवस्थान मानकरी न्हानू गावडे व निलेश नाईक उपस्थित होते.
माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, विकास कामांसंदर्भातील प्रस्तावाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी केली. परंतु सकारात्मक उत्तर मिळाले नाही. माऊली मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, सार्वजनिक स्वच्छतागृह व्यवस्था करणे, हायमास्ट बसविणे व ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देणे याविषयीचे प्रस्ताव ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागण्यात आले. मात्र प्रशासनाने सहकार्य केले नाही. त्यामुळे रोणापाल ग्रामपंचायत प्रशासनाची सखोल चौकशी करून संबंधित कामांना होणारा अडसर दूर करावा. तसेच ग्रामपंचायत प्रशासनावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केल्याच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तसेच देवी माऊलीला वंदन करून उपोषणास सुरुवात करणार असून यापुढे अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने लढा दिला जाईल असे प्रकाश गावडे यांनी सांगितले. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.