अन्यथा आंदोलन:मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
सावंतवाडी ता.०५-:
सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावातील सर्व्हे नं.११८ हिस्सा नं.१ या सामाईक जमिनीतील अनाधिकारे सुरू असलेले मायानिंग उत्खनन तात्काळ बंद करा. अन्यथा शाळा मायानिंग कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना देण्यात आला आहे.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ऍड अनिल केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, संपर्क अध्यक्ष अमित नाईक आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात, सर्व्हे नं.११८ हिस्सा नं.१ या मिळकतीमध्ये अनेक सहहिस्सेदारांची नावे सातबारात भोगवटदार म्हणून नोंद असली तरी संपुर्ण क्षेत्र हे कै. अनंत तातो गावडे, रा. तळवणे यांच्या एकट्याच्या नावे कुळ म्हणून नोंद आहे. संपुर्ण क्षेत्र हे कै. अनंत तातो गावडे यांच्या व त्यांचे पश्चात त्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्यक्ष कब्जभोग्य, कसवटच वहीवाटीखाली आहे. या मिळकतीमध्ये कै. अनंत तातो गावडे यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी लावून मोठी केलेली शेकडो काजू, आंबा व इतर उत्पन्न देणारी झाडे आहेत. या झाडांच्या उत्पन्नावर अनंत तातो गावडे यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालत होता.
मात्र, सातबारावर भोगवटदार म्हणून नोंद असलेल्या काही असामींनी एका मायानिंग कंपनीशी परस्पर संधान साधून ही मिळकत मायनिंग उत्खननासाठी दिलेली आहे. या कंपनीने दादागिरी करुन व दहशतीच्या जोरावर या मिळकतीमध्ये मायनिंग उत्खनन सुरु केलेले आहे. कै. अनंत तातो गावडे यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी याबाबत कंपनी कार्यालयात जावून प्रत्यक्ष भेट घेतली असता आपण तुम्हाला तुमच्या जमिनीचा योग्य तो मोबदला लवकरात लवकर देतो, असे पोकळ आश्वासन अनेक वेळा दिले. मात्र, अद्यापपर्यंत एक रुपया सुद्धा नुकसान भरपाई देखील कै. अनंत तातो गावडे यांच्या कुटुंबियांना दिलेला नाही. त्यामुळे मिळकतीमध्ये कुळ म्हणून नाव नमूद असलेल्या व ज्याच्या ताब्यात संपूर्ण मिळकत होती त्या कै. अनंत तातो गावडे यांच्या कुटुंबियांवर मायनिंग कंपनीकडून झालेला अन्याय दूर करण्यात यावा. तसेच त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही कागदोपत्री व्यवहार झालेला नसताना त्यांच्या मिळकतीमध्ये अनाधिकारे अतिक्रमण करुन सुरु करण्यात आलेले मायनिंग उत्खननाचे काम तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत या मायनिंग कंपनीविरुद्ध तीव्र आंदोलन करावे लागेल, असे नमूद करण्यात आले आहे.
