न्हावेली, सोनुर्ली पंचक्रोशीतील बीएसएनएलची खंडित सेवा सुधारा…

संदेश सावंत: अन्यथा बीएसएनएल कार्यालयाला घालू घेराव..

⚡सावंतवाडी ता.३१-: मागील काही दिवसांपासून न्हावेली, सोनुर्ली, आरोस पंचक्रोशीत सुरु असलेली बीएसएनएलची खंडित सेवा येत्या दोन दिवसात सुधारा अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामास तयार रहा, असा इशारा सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेचे न्हावेली मळेवाड विभाग समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते संदेश सावंत यांनी जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नु यांना दिला आहे.
या बाबतच्या तक्रारी सावंत यांच्याकडे या गावातील रहिवाश्यांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने येत्या दोन दिवसात सदर गावात बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास न्हावेली आरोस सोनुर्ली गावातील ग्रामस्थांसहित बीएसएनएल जिल्हा प्रबंधक श्री रविकिरण जन्नू यांना घेराव घालण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. पंचक्रोशीतील बीएसएनएल सेवा सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थी व बीएसएनएल ग्राहकांचे हाल होत आहेत. आजही कित्येक युवक वर्क फ्रॉम होम करीत आहेत तर पुढे काही दिवसातच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत असून विद्यार्थी सुद्धा ऑनलाईन अभ्यास करीत आहेत. बीएसएनएलच्या या अनागोंदी कारभारामुळे या विद्यार्थी वर्गाचे मोठ नुकसान होत असून याची जबाबदारी बीएसएनएल आपल्या डोक्यावर घेणार की रिचार्जच्या माध्यमातून फक्त पैसाच गोळा करणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. तर जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांच्याशी संपर्क साधला असता आज त्या ठिकाणी टेक्निकल टीम दाखल होणार असल्याचे त्यांनी माहिती दिली आहे.

You cannot copy content of this page