सावंतवाडी राजवाडा येथे लोककला महोत्सव संपन्न…

⚡सावंतवाडी ता.३०-: सहयोग ग्राम विकास मंडळ गरड माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा सावंतवाडी येथे लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . या लोककला महोत्सवाचे उद्घाटन सिधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर ,सहयोग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर , कळसुत्री बाहुल्यांचे खेळ करणारे श्री गणपत मसगे,श्री बाळकृष्ण मसगे, सुहासिनी नाईक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलतील लोककला सादर करणारे कलाकार, सहयोग ग्रामविकास मंडळाचे कार्यकर्ते तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व सावंतवाडी शहरातील कलाप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
याप्रसंगी राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले यांनी लोककला महोत्सव अत्यंत उत्तमरीत्या आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.युवराज लखमसावंत भोंसले म्हणाले की या लोककला महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक लोककलाकार यात सहभागी झाले त्यांच्या मागे आम्ही सदैव उभे राहू त्यांनी ही कला सातत्याने जोपासत राहायला हवी. कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि या जिल्ह्यांमध्ये अनेक पर्यटक येत असतात त्यांना ही कला पाहणे ही पर्वणी ठरणार आहे .या लोककला महोत्सवामध्ये कळसुत्री बाहुल्या, चामड्याच्या बाहुल्या , राधानृत्य, चीत्रकथी, गोंधळ ,पांगुळ बैल, गोफनृत्य, चपई नृत्य पिंगळी अशा अनेक कला सादर करण्यात आल्या. या लोककला महोत्सवासाठी सावंतवाडीकर जनतेचा फार मोठा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपक भाई केसरकर यांनी आॅनलाइन शुभेच्छा दिल्या , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर यांनी मानले.

You cannot copy content of this page