रियाज खान यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांनी उपोषण घेतले मागे..
बांदा/प्रतिनिधी
बांदा वाफोली मार्गावर गवळीटेम्ब वाडीपर्यंत गटाराचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून येत्या आठ दिवसात याबाबतचे नियोजन करण्यासाठी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी दिल्याने रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी छेडलेले उपोषण सायंकाळी मागे घेतले.
याठिकाणी गटाराचे काँक्रिटीकरण न केल्याने येथील नागरिकांना अनेक समस्याना समोरे लागत आहे. यासाठी शिवसेनेचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी ग्रामस्थांना घेऊन उपोषण छेडले. उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला आघाडी अध्यक्षा सौ अर्चना घारे परब, मनसे तालुका प्रमुख मिलिंद सावंत, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी रियाज खान, राजा खान, संजय आईर, मंथन गवस, मोहसीन खान, अन्वर खान, हनुमंत सावंत, श्रीकांत धोत्रे, सागर धोत्रे, मिताली सावंत, अक्षर खान, मुन्ना शेख, बंड्या खान, विवेक गवस, गौरांग शेर्लेकर, सुंदर सावळ, समीर ठाकूर, कृष्णा गायकवाड, विराज देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. श्री खान म्हणाले की, बांदा शहरातील निमजगावाडी व गवळीटेम्बवाडी येथील घरांच्या नोंदी या बांदा ग्रामपंचायत हद्दीत आहेत. त्या अनुषंगाने येथील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज व इतर सुविधा देण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. बांदा शहरातील इतर सर्व ठिकाणच्या रस्त्याच्या गटारांचे काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. मात्र बांदा शंकर मूर्ती ते गवळीटेम्ब वाडीतील रस्ते हे पूर्णपणे दुर्लक्षित आहे. याबाबत वेळोवेळी स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांना कल्पना देण्यात आली आहे. मात्र त्यांनी कधीही यासंदर्भात भूमिका घेतली नाही किंवा प्रश्न मांडला नाही. या रस्त्यावर गटार बांधकाम झाल्यास हा रस्ता सुस्थितीत राहणार आहे.
यावेळी सरपंच नाईक यांनी टप्प्याटप्प्याने गटाराचे काम करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
